BCCI Secretary Jay Shah and President Sourav Ganguly. (Photo Credits: ANI)

T20 World Cup 2021: बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी एएनआयशी बोलताना यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेबाबत मोठे अपडेट दिले आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार होता, पण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतंच ANI ला कळवले आहे की आता स्पर्धा युएई येथे आयोजित केली जाईल. "आम्ही आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलला कळवू की आम्ही टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये हलवत आहोत. तारखा आयसीसी ठरवेल." अबु धाबी, दुबई आणि शारजाह येथे वर्ल्ड कपचे सामने आयोजित केले जातील. दरम्यान, यापूर्वी ESPNCricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, 17 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप टी-20 स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. (Australia 2021 T20 WC Squad: वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेणाऱ्या खेळाडूंना संधी मिळणे कठीण, ऑस्ट्रेलियन कर्णधार Aaron Finch चे धक्कादायक विधान)

भारतात यंदा टी-20 वर्ल्ड कपचे आयोजित होणार होते तथापि, COVID-19 महामारीच्या दुसर्‍या लाटेचा फटका देशाला बसल्यानंतर भारताने विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करावे की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. उल्लेखनीय म्हणजे आयसीसीच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेपूर्वी बीसीसीआय करोनामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएलच्या 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा देखील यूएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. सप्टेंबर 19 रोजी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली जाईल तर अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपपूर्वी खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) उर्वरित 31 सामने टी -20 विश्वचषक होण्यापूर्वी युएईमध्येच खेळले जाणार आहेत. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये खेळाडू आणि सहकर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी सकारात्मक आल्यावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) एप्रिलमध्ये 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आले होते.