सुरेश रैनाने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पोलिसांचे मानले आभार; कुटुंबीयांवर घातक हल्ला करणाऱ्या तिघांच्या अटकेनंतर फलंदाजाची प्रतिक्रिया
सुरेश रैना आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Photo Credits: Facebook)

भारतीय टीमचा माजी सुरेश रैनाच्या (Suresh Raina) कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी दरोडेखोरांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात रैनाच्या काकांचा जागीच मृत्यू झाला होता आणि आत्या, दोन आत्तेभाऊ गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान रैनाच्या एका भावाचा मृत्यूही झाला. अखेर या प्रकरणाचा पंजाब पोलिसांनी छडा लावला आणि तीन जणांना अटक करत आली आहे. पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Capt. Amarinder Singh) यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती देत प्रकरण निकाली निघाल्याचं जाहीर केलं. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात (Pathankot District) दरोडेखोरांच्या हल्ल्यात रैनाचे 58 वर्षीय काका अशोक यांची हत्या झाली होती. यानंतर रैनाने ट्विट कडून राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलिसांचे (Punjab Police) आभार मानले. पंजाब पोलिसांनी अटक केलेलं 3 आरोपी सराईत गुन्हेगाराची टोळीतील सदस्य आहे. या प्रकरणातील आणखी 11 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. (Suresh Raina Relatives Attacked: सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या खून प्रकरणाचा लागला छडा, पंजाब पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीतील 3 सदस्यांना अटक)

रैनाने ट्विटमध्ये म्हटलं, आज सकाळी पंजाब येथे या प्रकरणाचा छडा लावणारी तपास अधिकाऱ्याची भेट घेतली ज्यांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली. मी त्यांच्या सर्व प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो. आपले नुकसान परत मिळवता येणार नाही परंतु यामुळे पुढील गुन्हेगारीवर नक्कीच प्रतिबंध लागेल. पंजाब पोलीस आणि पंजाबच्या मुख्यमंत्रांचे सहकार्याबद्दल आभार." पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता म्हणाले की, हे आरोपी दरोडेखोर-गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीचा एक भाग आहेत आणि या टोळीतील 11 इतर सदस्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पठानकोटमधील थरियाल या गावात राहणाऱ्या रैनाच्या नातेवाईकांच्या घरी 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने घुसले आणि धारधार शस्त्रांनी हल्ला केला. कुटुंब आपल्या घराच्या छतावर झोपलेले असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर शास्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर, या प्रकरणात आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून रैनाने मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे मदत मागितली होती. दरम्यान, आयपीएलसाठी युएईला गेलेला रैना या घटनेनंतर भारतात परतला आणि अनिवार्य क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून आज त्याने पंजाबमध्ये जाऊन आपल्या नातेवाईकांची भेट घेतली.