Sunrisers Hyderabad: आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सनराईजर्झ हैदराबादची खराब कामगिरी; व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले अपयशाचे कारण
VVS Laxman (Photo Credit: Twitter)

आयपीएलमध्ये मजबूत संघापैकी एक असलेल्या सनराईजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघाची यावर्षी खराब सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात हैदराबादच्या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे. महत्वाचे म्हणजे, शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कमी धावांचे आव्हान असतानाही हैदराबाद अपयशी ठरला आहे. यावर हैदराबाद संघाचे प्रशिक्षक व्ही.व्ही.एस लक्ष्मणने (VVS Laxman) नाराजी दर्शवली आहे. तसेच चेन्नईच्या मैदानावर सलग तिन्ही सामन्यात हैद्राबादचा संघ का हरला? याच्या नेमक्या कारणावर त्याने बोट ठेवले आहे.

दरम्यान लक्ष्मण म्हणाला की, सामन्यात एकेरी, दुहेरी धाव काढणे अधिक महत्वाचे असते. महत्वाचे म्हणजे, चेन्नईसारख्या खेळपट्यांवर मोठे फटके मारणे सोपे नाही. अशावेळी चौकार, षटकारांवर अवलंबून न राहता स्ट्राईक रोटेट करणे गरजेचे असते. सामन्यात अधिक निर्धाव चेंडू खेळले धोक्याचे असेत. तसेच स्ट्राईक रोटेट न केल्यास निर्धाव चेंडूची संख्या वाढत जाते. नवीन खेळाडूंना क्रीजवर येताच मोठे फटके मारणे कठीण आहे. त्यामुळे सेट झालेल्या फलंदाजांनी टिकून राहणे गरजेचे आहे, असे लक्ष्मण म्हणाला आहे. हे देखील वाचा- IPL 2021: 'या' खेळाडूमुळे मुंबई इंडियन्सला पराभूत करणे थोडे कठीण- वीरेंद्र सेहवाग

मुंबई विरुद्धच्या सामन्यात देखील हैद्राबादला केवळ 151 धावांचे लक्ष्य होते. त्यात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरिस्टो यांनी दमदार सलामी देखील दिली होती. मात्र, त्यानंतर हैद्राबादने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. ज्यामुळे हैदराबादच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. हैद्राबादचे फलंदाज यंदाच्या हंगामात सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहेत.