भारतीय (India) क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारत कोरोना व्हायरस (Coronavirus) मुक्त झाल्यास भारत ऑस्ट्रेलियाबरोबर टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) आयोजनाची अदला-बदल करण्याचा प्रस्ताव दिला. कोरोना व्हायरसने जूनपर्यंत जगातील सर्व स्पर्धा पुढे ढकलल्या किंवा रद्द केल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) आयोजित होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर संकट कायम आहे. अशा परिस्थितीत माजी भारतीय कर्णधार गावस्कर यांनी असे म्हटले की यजमान पदाची अदला-बदली करून या वेळी भारतात टी-20 विश्वचषक तर पुढच्या वर्षी ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केली जावी. 2021 वर्ल्ड कप टी-20 चे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. गावस्कर यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, जर अदलाबदल करणे शक्य झाले तर कोविड-19 चा भारतात प्रभाव कमी झाल्यास टी-20 वर्ल्ड कपच्या काही आठवड्यांपूर्वी आयपीएलचे आयोजन शक्य आहे. (IPL 2020: टी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यास होऊ शकते आयपीएलचे आयोजन, BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती)
"या क्षणी, आपल्या सर्वांना माहितच आहे की ऑस्ट्रेलियाने 30 सप्टेंबरपर्यंत परदेशीयांना देशात येण्यास प्रतिबंध केला आहे. ऑक्टोबरच्या मध्यभागी किंवा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ही स्पर्धा सुरू होत आहे, त्यामुळे याक्षणी ते काहीसे अवघड दिसत आहे, असे गावस्कर यांनी इंडिया टुडेला सांगितले. ते म्हणाले, "वर्ल्ड टी-20 पुढील वर्षी भारतात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया करारावर पोहोचू शकतात आणि दोन्ही देश वर्ल्ड कप आयोजनाची पडला-बदल करू शकतात." टी-20 विश्वचषक होण्यापूर्वी आयपीएलचा 13 व सत्र आयोजित केला पाहिजे, असेही गावस्कर म्हणाले. ते म्हणाले, “तसे झाल्यास टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल घेता येईल. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सराव करण्यासदेखील ते मदत करेल."
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) गुरुवारी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कपच्या आकस्मिक योजनांचा आढावा घेईल आणि व्हायरसचा त्रास कमी झाल्यावर हा खेळ पुन्हा सुरू करण्याच्या मार्गांवर चर्चा करेल, असे प्रशासकीय समितीने सोमवारी सांगितले. दरम्यान, सप्टेंबरमध्ये होणारा आशिया चषक पुढे ढकलण्याकडे आयोजकांचे लक्ष असू शकते, असेही गावस्कर म्हणाले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या कॉन्टिनेन्टल टी-20 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.