IND vs BAN Pink Ball Test: विराट कोहली याने सौरव गांगुली यांच्या टीमचे केले कौतुक, भडकलेल्या सुनील गावस्कर यांनी केली खोचक टिप्पणी
सुनील गावस्कर आणि विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारतीय संघाने (Indian Team) रविवारी गुलाबी बॉल टेस्टमध्ये बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला. यासह टीम इंडियाने बांग्लादेशविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिकाही 2-0 ने जिंकली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टीम इंडियाचा हा सलग तिसरा मालिका विजय आहे. कसोटी क्रिकेटमधील सध्याच्या भारतीय संघाच्या वर्चस्वाचा अंदाज यावरून काढता येतो की या तीन मालिकांनी कोणतेही सामने न गमावता टीम इंडियाने क्लीन-स्वीपने विजयाची नोंद केली आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेनंतर बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाने क्लीन-स्वीप केला आहे. भारताच्या टेस्ट इतिहासातीलसलग विजयाच्या बाबतीत ही त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात टीम इंडिया सर्वाधिक डाव आणि धावांनी सलग चौथ्यांदा विजयाची नोंद केली. हा एक विश्वविक्रमही आहे. (IND vs BAN Pink Ball Test: कॉमेंट्रीदरम्यान संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले  यांच्यात झाला वाद, नाराज Netizens ने मांजरेकरांना केले ट्रोल)

मॅचनंतरच्या सादरीकरणाच्या वेळी कोहलीने बीसीसीआयचे (BCCI) प्रमुख आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचे कौतुक केले आणि म्हटले की आम्ही भारतीय संघाचा विजय सुरू करणार्‍या दादाच्या संघाची परंपरा पुढे ठेवत आहोत. पण त्यानंतर विराटच्या वक्तव्यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर झालेल्या कार्यक्रमात गावस्करांनी विराटच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाले की, हा एक विलक्षण विजय आहे परंतु मला एक मुद्दा सांगायचा आहे. भारतीय कर्णधार म्हणाला की ही गोष्ट 2000 मध्ये दादांच्या टीमपासून सुरू झाली होती. मला माहित आहे की दादा बीसीसीआय अध्यक्ष आहेत, म्हणून कदाचित त्यांना दादांबद्दल छान गोष्टी सांगायच्या आहेत. पण 1970 व 1980 च्या दशकातही भारत जिंकत होता. त्यावेळी त्याचा जन्मही झाला नव्हता, ”सुनील गावस्कर ऑन एअर म्हणाले.

“बर्‍याच लोकांना असे वाटते की क्रिकेट फक्त 2000 मध्येच सुरू झाले. परंतु भारतीय संघाने 1970 च्या दशकात परदेशात विजय मिळविला आहे. भारतीय संघाने 1986 मध्ये परदेशात विजय मिळवला. भारतीय संघाने परदेशात मालिका अनिर्णित केली. इतर संघांप्रमाणेच त्यांचाही पराभव झाला.”