Anurag Thakur on Rameez Raja: 'भारताकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही...', क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी रमीझ राजाच्या वक्तव्यावर लगावला टोला
Anurag Thakur And Rameez Raja (Photo Credit - FB/TW)

IND vs PAK: आशिया चषक पुढील वर्षी म्हणजे 2023 (Asia Cup 2023) मध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि बीसीसीआयने (BCCI) स्पष्टपणे सांगितले आहे की टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआयच्या या भूमिकेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही (PCB) प्रत्युत्तर दिले आहे. अलीकडेच पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांनी इशारा दिला होता की, जर भारतीय क्रिकेट संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर पाकिस्तानचा संघही पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. ऑक्टोबरच्या सुरुवातीला, बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी 2023 आशिया चषकासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याबाबतची अटकळ पूर्णपणे फेटाळून लावली होती आणि म्हटले होते की आशिया कप तटस्थ ठिकाणी आयोजित केला जाईल.

अनुराग ठाकूर यांनी लगावला टोला

आता भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे पीसीबी चेअरमन रमीझ राजा यांच्या पाकिस्तान संघ भारतात न येण्याबाबतच्या वक्तव्यावर आले आहे. वास्तविक, रमीझ राजा यांच्या वक्तव्याबाबत क्रीडामंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी योग्य वेळेची वाट पहा, असे स्पष्ट केले. भारत आज क्रीडा विश्वातील एक मोठी शक्ती आहे आणि कोणताही देश त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. (हे देखील वाचा: Afganistan कडून हरल्यानंतर Sri Lanka ला मोठा धोका, भारतात होणाऱ्या विश्वचषकात थेट मिळणार नाही प्रवेश!)

'पाकिस्तानशिवाय विश्वचषक कोण पाहणार?' - रमीझ राजा

पीसीबी प्रमुखांनी शुक्रवारी पाकिस्तानी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, या प्रकरणी आमची भूमिका स्पष्ट आहे, जर ते (भारतीय क्रिकेट संघ) आशिया चषकासाठी आमच्याकडे आले तर आम्ही आमचा संघ भारतात पाठवू. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा संघ सहभागी झाला नाही, तर ती स्पर्धा कोण पाहणार? या प्रश्नावर आमची भूमिका आक्रमक असेल. त्यांच्याविरुद्ध आमचा संघ चांगला खेळत आहे. आम्ही एका वर्षात दोनदा सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या संघाला पराभूत केले आहे. आम्ही टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळलो आहोत.