SL vs ENG 2nd Test 2021: इंग्लंड (England) कसोटी संघाचा कर्णधार जो रूट (Joe Root) श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) सुरु असलेल्या कसोटी मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो पुढाकाराने संघाचे नेतृत्व करीत असून दुसर्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतक झळकावले. पहिल्या टेस्ट सामन्यात त्याने दुहेरी शतक झळकावत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. आणि आता श्रीलंकाविरुद्ध पहिल्या डावात शतक ठोकताच त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीचे 19वे शतक पूर्ण केले. या शतकासह रूटने जागतिक विक्रम नोंदवला आहे. परदेशी कर्णधार म्हणून श्रीलंकेत सर्वाधिक कसोटी शतक करणारा आता तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. रूटने कसोटी कर्णधार म्हणून श्रीलंकेत तिसरे शतक झळकावत विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि स्टीफन फ्लेमिंगला मागे टाकले. कर्णधार म्हणून श्रीलंकेत कसोटीत विराट, सचिन आणि फ्लेमिंगने प्रत्येकी दोन शतकं ठोकली आहेत. (SL vs ENG 2nd Test 2021: जेम्स अँडरसनचा Glenn McGrath याच्या रेकॉर्डवर हातोडा, भारत दौर्यापूर्वी श्रीलंकेत केली कमाल)
या दरम्यान रूटने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या 15,000 धावाही पूर्ण केल्या. रूटने पहिल्या डावात 139 चेंडूंचा सामना करत शंभरी गाठली. रूटने आपल्या शतकी खेळीत 14 चौकार ठोकले. इतकंच नाही तर रूट आता दौऱ्यावर आपल्या दुसऱ्या द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आणि फॅब फोरबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली परदेशात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने परदेशी भूमीवर एकूण 14 शतकं केली आहेत, तर स्टीव्ह स्मिथ 13 शतकांसह दुसर्या क्रमांकावर आहे. केन विल्यमसन 11 शतकांसह तिसऱ्या आणि जो रूट 8 शतकांसह चौथ्या स्थानावर आहे. रूटचे श्रीलंकाविरुद्ध हे शतक इंग्लंड फलंदाजासाठी आणखी खास ठरले. रूट आपल्या टेस्ट कारकिर्दीतील 99वा सामना खेळत आहे. रूटच्या आधी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांनी कसोटी कारकीर्दीतील 99व्या कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे.
Joe Root has now gone past Kevin Pietersen to become England’s fifth-highest run-getter in Tests 🙌
Can you name the top four? 👀 pic.twitter.com/Df9XkBn2Un
— ICC (@ICC) January 24, 2021
दुसरीकडे, रूटने टेस्ट करिअरच्या 8000 धावांचा टप्पा गाठला आणि इंग्लंड मानाच्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले. रूट इंग्लंडकडून सर्वाधिक टेस्ट धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे तर मार्च महिन्यात भारताविरुद्ध कसोटी सामन्यांनंतर रूट सहज तिसर्या स्थानावर जाऊ शकतो. रूटला तिसरे स्थान मिळवण्यासाठी आणखी 345 धावांची गरज आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने 12,472 कसोटी धावांसह इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे.