SL vs ENG 2nd Test 2021: जेम्स अँडरसनचा Glenn McGrath याच्या रेकॉर्डवर हातोडा, भारत दौर्‍यापूर्वी श्रीलंकेत केली कमाल
जेम्स अँडरसन (Photo Credit: Getty Images)

SL vs ENG 2nd Test 2021: श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) गाले (Galle) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या (Glenn McGrath) आकड्याला मागे टाकले आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 30 वेळा पाच विकेट घेण्याची कमाल केली. श्रीलंकेच्या पहिल्या डावात अँडरसनने 29 ओव्हरमध्ये 40 धावा देत 6 विकेट घेतल्या आणि श्रीलंका संघावर हल्ला चढवला. अँडरसनने निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, अँजलो मॅथ्यूज, कुसल परेरा आणि लाहिरू थिरिमाने यांना बाद करून दुसर्‍या दिवशी पाच विकेट पूर्ण केल्या आणि सर्वाधिक वेळा 5 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर कब्जा केला. अ‍ॅन्डरसनने आशिया खंडात दुसऱ्यांदा 5 विकेट घेतल्या आहेत. 26 मार्च, 2012 रोजी श्रीलंकाविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या, मात्र संघाला त्या सामन्यात 75 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. (IND vs ENG Series 2021: विराट कोहलीला सर्वाधिक वेळा नडला इंग्लंडचा हा गोलंदाज, किंग कोहलीला पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी मैदानावर उतरणार)

श्रीलंकेचा फिरकी दिग्गज मुथय्या मुरलीधरन 133 सामन्यांत कसोटी क्रिकेटमध्ये 67 वेळ पाच विकेट घेत या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न (37), न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडली (36), माजी कर्णधार अनिल कुंबळे (35) आणि श्रीलंकेचा माजी स्पिनर रंगना हेराथ (34) यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे रिचर्ड हॅडली यांच्यानंतर सर्वाधिक वेळा डावात 5 विकेट घेणारा अँडरसन दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. दरम्यान, 38 वर्ष आणि 177 दिवसात अँडरसन आशियात एका डावात 5 विकेट घेणारा दुसरा वयस्कर गोलंदाज ठरला. श्रीलंकेचा डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने 40 वर्ष 123 दिवसात कोलंबो येथे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एका डावात 5 विकेट घेतल्या होत्या. अँडरसनने डिकवेलाच्या विकेटसह डावात पाच विकेट पूर्ण केले आणि अवघ्या दोन चेंडूनंतर त्याने सुरंगा लकमललाही पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

दुसरीकडे, अँडरसनने श्रीलंकेत आतापर्यंत 7 कसोटी सामन्यात 32.94 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. 600 पेक्षा अधिक विकेट घेणारा एकमेव वेगवान गोलंदाज अँडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये 157 सामन्यात चौथ्या सर्वाधिक 606 विकेट घेतल्या आहेत. भारताच्या अनिल कुंबळेला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी 14 विकेटची गरज आहे. अँडरसनच्या 6 विकेटच्या जोरावर इंग्लंडने लंकन संघाचा पहिला डाव 139.3 ओव्हरमध्ये 381 धावांवर आटोपला. अँडरसनऐवजी मार्क वूडने 3 आणि सॅम कुरनला 1 विकेट मिळाली.