SL vs AUS 2022 Series: ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्यासाठी श्रीलंकेचा मोठा डाव, आता ‘हा’ दिग्गज आखणार गोलंदाजीची रणनीती
लसिथ मलिंगा (फोटो सौजन्य-PTI)

SL vs AUS 2022 Series: ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेने (Sri Lanka) अनुभवी लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) त्यांचे 'गोलंदाजी धोरण प्रशिक्षक' म्हणून नियुक्त केले आहे. मलिंगा संघासोबत रणनीतिक योजना आणि तांत्रिक कौशल्यावर काम करेल, असे श्रीलंका क्रिकेटच्या (Sri Lanka Cricket) निवेदनात म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. यानंतर गालेमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. "श्रीलंका क्रिकेटला विश्वास आहे की मलिंगाचा सखोल अनुभव आणि प्रसिद्ध डेथ-बॉलिंग कौशल्य, विशेषत: T20 फॉर्मेटमध्ये, संघाला या महत्त्वपूर्ण मालिकेत नेव्हिगेट करण्यात मदत होईल," SLC ने पुढे एका निवेदनात म्हटले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा माजी कर्णधाराने हीच भूमिका बजावली होती. वेगवान गोलंदाजीतील त्याच्या उत्कृष्टतेमुळे तो तरुणांसाठी खरोखरच एक चांगला मार्गदर्शक बनला आहे. मलिंगाने अलीकडेच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले, ज्यांनी आयपीएल 2022 मध्ये अंतिम फेरी गाठली. श्रीलंकेचा 2014 टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार लसिथ मलिंगाने गेल्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यॉर्कर्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 4 चेंडूत 4 बळी घेतले आहेत. श्रीलंकेच्या या वेगवान गोलंदाजाने 30 कसोटी सामने, 226 एकदिवसीय सामने आणि 84 टी-20 सामने खेळून 546 बळी घेतले. तसेच त्याने वनडेमध्ये 338, कसोटीत 101 आणि T20 मध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत. लक्षणीय आहे की मलिंगाने जुलै 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याच्या कसोटी पदार्पणाच्या 16 दिवसांनंतर, मलिंगाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळला.

दुसरीकडे, 2021 टी-20 विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया संघ सध्या जबरदस्त लयीत आहे. पाकिस्तान दौऱ्यावर एकमात्र टी-20 काबीज केल्यावर संघाने एकदिवसीय मालिका गमावली असली तरी संघातील प्रत्येक खेळाडूने फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले होते. याशिवाय नुकत्याच संपुष्टात आलेल्या आयपीएलमधेही खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे मायदेशात खेळूनही यजमान श्रीलंकेसमोर कांगारू संघाचे मोठे आव्हान असणार आहे.