
Rohit Sharma: रोहित शर्मा (Rohit Sharma) आता एमएस धोनी नंतर भारताच्या दुसऱ्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. हिटमनने आत्तापर्यंत 2 आयसीसी ट्रॉफी भारताला जिंकून दिल्या आहेत. कपिल देव यांना मागे टाकत त्याने हा मान मिळवला. कपिल देवने भारतासाठी एक आयसीसी ट्रॉफी (1983 विश्वचषक) जिंकून दिला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत टीम इंडियाच्या जवळजवळ सर्वच खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. रोहित शर्माने श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) कौतुक करत त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारतासाठीचा 'सायलेंट हिरो' म्हटले आहे. (Michael Bracewell New Zealand New Captain: चॅम्पियन्स ट्रॉफी गमावल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार बदलला, या खेळाडूला मिळाली कमान)
रोहित शर्मा काय म्हणाला?
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेत जेव्हा जेव्हा भारतीय संघाला श्रेयस अय्यरची गरज होती तेव्हा तो मधल्या फळीत भारतासाठी खंबीरपणे उभा राहिला. त्याने स्पर्धेत अनेक दमदार खेळी खेळल्या. अशा परिस्थितीत आता रोहित शर्मानेही अय्यरला सायलेंट हिरो म्हटले आहे. भारताकडून सर्वाधिक धावाही अय्यरने केल्या. या बाबतीत त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकले.अय्यरने अंतिम सामन्यातही शानदार खेळी केली. त्याने कठीण काळात संघासाठी ४८ धावा केल्या.
रोहित शर्मालाही अंतिम सामन्यानंतर श्रेयस अय्यरचे कौतुक करावे लागले. रोहित शर्मा म्हणाला की, संपूर्ण स्पर्धेत आपण अय्यरला विसरू नये. त्याने भारतासाठी सायलेंट हिरोची भूमिका बजावली. तो मधल्या फळीत टीम इंडियासाठी एक महत्त्वाचा दुवा होता. अय्यरने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या डळमळीत डावालाही सांभाळले.
अय्यरने उपांत्य सामन्यात 45 धावांचे योगदान दिले. तर त्याने न्यूझीलंडविरुद्ध 79 धावा केल्या आणि पाकिस्तानविरुद्ध अय्यरच्या बॅटमधून 56 धावा आल्या. अय्यर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचिन रवींद्र नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अय्यरने 5 सामन्यांमध्ये 48.60 च्या सरासरीने 243 धावा केल्या. तर रचिनने 5 सामन्यांमध्ये 65.75 च्या सरासरीने 263 धावा केल्या.