भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील माजी खेळाडूंनी आपापली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारताचा पराभव करेल, असा विश्वास शोएब अख्तर याने व्यक्त केलाय. विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारताने बाजी मारलेली आहे.
वनडे विश्वचषकात पाकिस्तानला आतापर्यंत भारताचा पराभव करता आलेला नाही. मोठ्या सामन्यात दबाव झेलण्याची पाकिस्तानच्या संघाचे मजबूत बाजू असल्याचे शोएबने म्हटलेय. भारतीय संघावर वारंवार जिंकण्याचा दबाव आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताचा पराभव करण्याची पाकिस्तानकडे मोठी संधी असेल, असे शोएब अख्तर म्हणाला.
2 सप्टेंबर रोजी श्रीलंका येथील पल्लेकेले स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. आशिया चषक यंदा एकदिवसीय स्वरुपात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोन सामने होतील.