![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/Shane-Warne-380x214.jpg)
Shane Warne Dies: ‘फिरकीचा जादूगार’ शेन वॉर्न (Shane Warne) याचे अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला हादरून सोडले. थायलंड पोलिसांच्या (Thailand Police) माहितीनुसार चार मित्रांनी 20 मिनिटे जीव वाचवण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही ऑस्ट्रेलिया दिग्गज शेन वॉर्न यांचे वयाच्या 52 व्या वर्षी 4 मार्च रोजी संशयास्पद हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. थायलंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेन वॉर्नचा जीव वाचवण्यासाठी तीन मित्रांनी वारंवार प्रयत्न केले पण यश आले नाही. वॉर्नचा जीव वाचवण्यासाठी मित्रांनी 20 मिनिटे झुंज दिली. थाई पोलिसांनी सांगितले की वॉर्न आणि इतर तीन मित्र कोह सामुई येथील एका खाजगी व्हिलामध्ये राहत होते व माजी क्रिकेटर जेव्हा जेवायला पोहोचला नाही तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याची चौकशी केली. (Shane Warne Passed Away: ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने घेतला जगाचा निरोप, हे ठरलं त्याच शेवटचं ट्विट)
“मित्राने त्याला सीपीआर दिला आणि रुग्णवाहिका बोलावली,” बो पुट पोलिसांचे अधिकारी चॅटचाविन नाकमुसिक यांनी Reuters ला फोनवर सांगितले. “त्यानंतर इमर्जन्सी रिस्पॉन्स युनिट आले आणि 10-20 मिनिटांसाठी दुसरा सीपीआर दिला. त्यानंतर थाई इंटरनॅशनल हॉस्पिटलची अॅम्ब्युलन्स आली आणि त्यांना घेऊन गेली. त्यांनी पाच मिनिटांसाठी सीपीआर दिला आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. वॉर्नच्या मृत्यूचे कारण माहित नाही परंतु ते संशयास्पद म्हणून हाताळले जात नाही,” चॅटचाविन पुढे म्हणाले. लक्षात घ्यायचे की वॉर्नचे शेवटचे ट्विट ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे दुसरे माजी महान, यष्टिरक्षक रॉड मार्श यांना श्रद्धांजली देत केले होते. मार्श यांचे शुक्रवारी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.
लेग-स्पिनच्या कलेचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय दिले जाणाऱ्या वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. आणि या खेळातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून त्याने आपली 15 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आणली. वॉर्न कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा एकूण दुसरा तर ऑस्ट्रेलियाचा नंबर एक गोलंदाज आहे. वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 708 तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 1001 विकेट घेतल्या आहेत. जगभरात ‘वॉर्नी’ म्हणून ओळखले जाणारा दिग्गज क्रिकेटपटू 1990 च्या दशकात जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयास आला तेव्हा त्याने लेग-स्पिन गोलंदाजीची कला पुनरुज्जीवित केली आणि ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी युगांपैकी एक मध्यवर्ती शोमनपैकी एक होता.