File image of Majid Haq (Photo Credits: Getty Images)

जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रभाव आता अजून वाढला आहे. आतापर्यंत अनेक क्षेत्रातील मान्यवरांना या विषाणूने ग्रासले आहे. आता क्रिकेट विश्वातही या विषाणूचा शिरकाव झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या पहिल्या क्रिकेटरची पुष्टी झाली आहे. पाक मूळचा माजिद हक (Majid Haq) याची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. स्कॉटलंड क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या माजिदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः माजिदने सोशल मिडियावर ही माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये माजिदने आपण लवकरच बरे होऊन, घरी परत येऊ अशी आशा व्यक्त केली आहे.

स्कॉटलंड क्रिकेट संघाचा 37 वर्षीय स्पिनर माजिदची चाचणी सकारात्मक आल्यावर, त्याला ताबडतोब ग्लासगोच्या रॉयल अलेक्झांडर रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तो यातून रिकव्हर होत असल्याची माहितीही त्याने दिली आहे. 2006 ते 2015 पर्यंत स्कॉटलंडकडून 54 एकदिवसीय सामने आणि टी -20 सामने खेळणार्‍या हकने शुक्रवारी ही माहिती दिली. वर्ल्ड कप -2015 मध्ये माजिद अखेर स्कॉटलंडकडून खेळला होता. नेल्सनमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 1 धाव केली होती. यात त्याने एकाही विकेट घेतली नव्हती. (हेही वाचा: ऑलिंपिक रद्द होण्यापासून रोखण्यासाठी जपान पुरेसे COVID-19 चाचण्या करत नाही? सायना नेहवाल ने शेअर केली 'धक्कादायक' पोस्ट)

गुरुवारी रात्री 9 पर्यंत, स्कॉटलंडमध्ये कोरोनाव्हायरसची 266 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. सध्या कोरोनामुळे भारत-दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड वन डे मालिका, श्रीलंका-इंग्लंड कसोटी आणि रोड सेफ्टी सिरीज मालिका रद्द करण्यात आली आहे. याशिवाय आयपीएलचे कामही 15 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. याशिवाय पाकिस्तान सुपर लीगचे नॉक आउट सामनेही तहकूब करण्यात आले आहेत. जगातील सर्व क्रिकेट बोर्डानेही सर्व प्रकारचे क्रिकेट सामने त्वरित बंद केले आहे. क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही कोरोनाचा प्रभाव दिसून आला आहे.