SA vs ENG Test 2020: जो रुट याची विकेट घेतल्यानंतर आक्रामक सेलिब्रेशनसाठी कागिसो रबाडाविरुद्ध ICC ने केली कारवाई, वांडरर्स सामन्यातून आऊट
कागिसो रबाडा (Photo Credits: Twitter @OfficialCSA)

इंग्लंडविरुद्ध अंतिम कसोटीसाठी कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दोन्ही देशांमधील या मालिकेचा तिसरा कसोटी सामना सुरू आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज रबाडाच्या रूपात यजमान दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. आयसीसीच्या (ICC) आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे प्रोटीस संघाचा वेगवान गोलंदाज रबाडाला आयसीसीने कसोटी सामन्यासाठी बंदी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज रबाडाला चौथ्यांदा आयसीसीची आचारसंहिता भंग केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. यासह आयसीसीने त्यांच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडला असून 15 टक्के मॅच फीचाही दंड ठोठावला आहे. पोर्ट एलिझाबेथ येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रबाडा आयसीसी आचारसंहिता लेव्हल 1 नियम तोडल्याबद्दल दोषी आढळला असल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. (SA vs ENG 3rd Test: परदेशी भूमीवर सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा इंग्लंड ठरला पहिला संघ, आजवर खेळला आहे इतके टेस्ट्स)

रबाडाने आयसीसीच्या आचारसंहितेचा कलम 2.5 तोडला आहे. जेव्हा कोणताही गोलंदाज फलंदाजाला बाद केल्यावर अत्यंत आक्रमक भाषा, कृती आणि हावभाव दाखवून करतो तेव्हा तो हा नियम मोडतो. इंग्लंडचा टेस्ट कर्णधार जो रुट (Joe Root) याला बोल्ड केल्यानंतर रबाडाने विचित्र वागणूक केल्याने त्याच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर रबाडाने आपला गुन्हा कबूल केला आणि आयसीसी एलिट पॅनेलच्या मॅच रेफरी अ‍ॅन्डी पायक्रॉफ्टने दिलेली शिक्षाही स्वीकारली. महत्वाची बाब म्हणजे गेल्या 24 महिन्यांत रबाडाच्या खात्यात 4 डिमरेट गुण जोडले गेल्याने त्याला पुढील कसोटी सामन्यासाठी बंदी घालण्यात अली आहे.

दरम्यान, पोर्ट एलिझाबेथ (Port Elizabeth) मध्ये यजमान दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसरा सामना हा इंग्लंडसाठी अत्यंत खास आहे. 143 वर्षांपासून खेळत असलेल्या इंग्लंडचा परदेशी भूमीवर हा 500 वा सामना आहे. आजवर खेळलेल्या सामन्यात इंग्लंडने 149 सामने जिंकले, तर 182 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आणि 168 सामने ड्रॉ राहिले.