SA vs ENG: बेन स्टोक्स याने नोंदवला कॅचचा नवीन विश्वविक्रम, 142 वर्षानंतर पहिल्यांदा इंग्लंडसाठी केला असा रेकॉर्ड
बेन स्टोक्स (Photo Credit: AP/PTI Photo)

इंग्लंडचा (England) अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला. स्टोक्सने जेम्स अँडरसन (James Anderson) याच्या गोलंदाजीवर एनरिच नॉर्टजे याचा झेल पकडला आणि इंग्लंडसाठी नवीन विक्रमाची नोंद केली. स्टोक्सचा हा पाचवा झेल होता. आणि त्याने आपले सर्व कॅच स्लिपमध्ये घेतले. इंग्लंडच्या गेल्या 1019 कसोटी सामन्यांमध्ये 23 वेळा एका खेळाडूने एका सामन्यात चार झेल घेतले होते पण कोणीही पाच झेल घेतले नाहीत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने गेल्या वर्षी लॉर्ड्स येथे आयर्लंडविरुद्ध डावात चार झेल पकडले होते. सेंच्युरियन टेस्टमध्ये पाच झेल पकडून स्टोक्सने जागतिक विक्रमाची बरोबरी केली. टेस्ट सामन्यात पाच झेल पकडणारा स्टोक्स पहिला इंग्लिश क्रिकेटपटू ठरला. टेस्ट सामन्यांमध्ये 11 वेळा खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. स्टोक्सच्या अगोदर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने 2017-18 मध्ये न्यूझीलंडमध्ये हे केले होते. (वडिलांचं खराब स्वास्थ पाहून बेन स्टोक्स झाला भावुक, वर्ष 2019 मध्ये कमावलेल्या यशाचा त्याग करण्यास तयार पण...)

स्टोक्सने झुबैर हमजा, फाफ डु प्लेसिस, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, ड्वेन प्रेटोरियस आणि एनरिचनॉर्टजे यांचे विकेट घेतले. एकूणच, हे प्रभावी कामगिरी करणारा तो जगातील 12 वे क्रिकेटर ठरला आहे. 1936 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या विक रिचर्डसन (Viv Richardson) याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात पहिल्यांदा ही प्रभावी कामगिरी केली होती. इंग्लंडने 1877 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.

दरम्यान, दोन्ही संघातील मॅचबद्दल बोलायचे झाले तर, तिसर्‍या दिवशी इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 223 धावांवर ऑल आऊट केले आणि पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेतली. जेम्स अँडरसन याने दक्षिण आफ्रिकेची उर्वरित दोन्ही विकेट्स घेऊन आपल्या कसोटी कारकीर्दीतील 28 वेळा पाच विकेट घेण्याचा टप्पा पूर्ण केला. त्याने 40 धावांत पाच गडी बाद केले. रविचंद्रन अश्विन आणि इयान बोथम यांनी 27 वेळा टेस्टमध्ये पाच गडी बाद केले आहेत. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेण्याच्या यादीत आता आठव्या स्थानावर पोहचला आहे. श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याने कसोटी सामन्यात सर्वाधिक 133 सामन्यांत 67 वेळा हे कामगिरी केली आहे.