RR vs KKR IPL 2021 Match 18: मॉरिस-सॅमसनचा कोलकाताला दे धक्का, राजस्थान रॉयल्सचा 6 विकेटने विजय
संजू सॅमसन आणि शिवम दुबे (Photo Credit: Twitter/@IPL)

RR vs KKR IPL 2021 Match 18: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 18व्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दणक्यात कमबॅक करत 6 विकेटने कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) मात केली. नाईट रायडर्सचा हा सलग चौथा पराभव ठरला. कोलकाताने दिलेल्या 134 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात राजस्थानने ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थानसाठी कर्णधार सॅमसनने नाबाद राहून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. सॅमसनने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या तर यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने प्रत्येकी 22 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, बॅटनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी प्रभावी बॉलिंग केली पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarty) सर्वाधिक 2 विकेट काढल्या तर शिवम मावी व प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (RR vs KKR IPL 2021: नया है वह! Riyan Parag-राहुल तेवतियाच्या विकेट सेलिब्रेशनने वेधले सर्वांचेच लक्ष, सामना सुरु असताना मैदानात घेतली सेल्फी)

कोलकाताच्या 134 धावांचा पाठलाग करताना राजस्थान संघाला तिसऱ्या ओव्हरमध्ये चक्रवर्तीने पहिला धक्का दिला. चक्रवर्तीने रॉयल्सचा घातक ओपनर जोस बटलरला 5 धावांवर पायचीत करत माघारी धाडलं. 22 धावांवर फलंदाजी करणारा यशस्वी झेलबाद होऊन तंबूत परतला. त्यांनतर, शिवम दुबेला चक्रवर्तीने कृष्णाकडे झेलबाद केले. यादरम्यान, शुबमन गिलने 13व्या ओव्हरमध्ये राहुल तेवतियाला जीवनदान दिलं मात्र राजस्थानचा अष्टपैलू त्याचा अधिक फायदा उचलू शकला नाही 5 धाव करून आऊट झाला. अखेरीस कर्णधार सॅमसनने डेविड मिलरच्या (David Miller) साथीने संघाचा विजय निश्चित केला. मिलर 24 धावा करून नाबाद राहिला. राजस्थानचा आयपीएल 14 मधील हा दुसरा विजय असून त्यांचा तीन सामन्यात पराभव झाला आहे.

यापूर्वी, टॉस गमावून पहिले करणाऱ्या नाईट रायडर्सकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. शिवाय, दिनेश कार्तिकने 25 तसेच नितीश राणाने 22 धावांसह योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थानसाठी लिलावात महागडा ठरलेल्या क्रिस मॉरीसने 4 विकेट्स घेतल्या.