भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 जुलैपासून खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय संघाची ही पहिलीच कसोटी मालिका असेल. टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या पुढील सायकलची सुरुवात विजयाने करायची आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खेळाडू या मालिकेच्या तयारीत व्यस्त आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) डोमिनिका येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या गोलंदाजीचे संयोजन उघड केले आहे. या सामन्यात तो कोणत्या गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो हे त्याने सांगितले. रोहित शर्माच्या मते, येथे फिरकीपटूंना खूप मदत मिळू शकते आणि यासाठी संघ दोन फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरेल.
मालिका सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला आणि संघाच्या संयोजनाबद्दल सांगितले. तो म्हणाला, विकेट बघता असे दिसते की आम्ही दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांसह जाऊ. आपण जे पाहिले त्यावरून, 2017 मध्ये येथे शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता आणि फिरकीपटूंनी भरपूर विकेट घेतल्या होत्या. आम्ही येथे खूप सराव केला आहे आणि आम्हाला ज्या प्रकारचा बाउंस मिळाला आहे, आम्हाला वाटते की 3-2 संयोजनासह जाणे योग्य होईल. (हे देखील वाचा: IND vs WI 1st Test 2023: डॉमिनिका कसोटीपूर्वी कोहली आणि द्रविड झाले भावूक, दिला जुन्या आठवनींनी उजाळा; पहा व्हिडिओ)
भारतीय संघाकडे फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांसारख्या दिग्गजांचा पर्याय आहे. अश्विन आणि जडेजा यांच्या जोडीने संघ मैदानात उतरू शकतो. यावेळी संघात अनेक युवा वेगवान गोलंदाजही आहेत जे चांगली कामगिरी करू शकतात. त्यांच्या कामगिरीला खूप महत्त्व असेल आणि सर्वांच्या नजरा या युवा खेळाडूंवर असतील.