IND vs BAN 2nd ODI 2022: बांगलादेशने तीन एकदिवसीय सामन्यांच्या (IND vs BAN) मालिकेतही 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. बांगलादेशने 2015 नंतर प्रथमच भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे. या मालिकेतील पहिल्या वनडेत बांगलादेशने भारताचा एका विकेटने पराभव केला. पहिल्या सामन्यातील चुकीची पुनरावृत्ती भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही केली. एकवेळ बांगलादेशने 69 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. पण, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली आणि याचा फायदा घेत बांगलादेशने 271 धावा केल्या. मीरपूरच्या संथ विकेटवर ही धावसंख्या भारताला जड होती. मालिका गमावल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) क्लबमध्ये सामील झाला. बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावणारा तो दुसरा भारतीय कर्णधार आहे.
बांगलादेश संघाची चमकदार कामगिरी सुरूच
यापूर्वी 2015 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने गमावली होती. घरच्या मैदानावर बांगलादेश संघाची चमकदार कामगिरी सुरूच आहे. ऑक्टोबर 2016 पासून बांगलादेशने मायदेशात एकही वनडे मालिका गमावलेली नाही. (हे देखील वाचा: Team India ला दुहेरी झटका, कर्णधार Rohit Sharma परतणार मायदेशी, Rahul Dravid यांनी दिली माहिती (Watch Video)
टीम इंडियाने सलग दुसरी वनडे मालिका गमावली
टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे. मात्र, संघाने सलग दोन एकदिवसीय मालिका गमावली आहे. बांगलादेशापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा 1-0 असा पराभव झाला होता. किवीजविरुद्ध शिखर धवन कर्णधार होता. बांगलादेशविरुद्ध रोहित, विराट कोहली आणि केएल राहुलसह वरिष्ठ खेळाडू परतले, पण संघ विजयी मार्गावर परत येऊ शकला नाही.