मंगळवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सोमवारी टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 357 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने हा सामना 228 धावांनी गमावला. आता टीम इंडियाने कमी धावसंख्येच्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक 2023 च्या सुपर 4 सामन्यात आपल्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 48 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी केली. रोहित शर्माच्या या स्फोटक खेळीत 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यासह रोहित शर्माने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचा अनोखा विक्रम मोडीत काढला आहे.
रोहित शर्माने शाहिद आफ्रिदीचा अनोखा विक्रम मोडला
आशिया कप (ODI) च्या इतिहासात रोहित शर्मा आता सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत रोहित शर्माने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीलाही मागे टाकले आहे. आशिया कप वनडे फॉरमॅटच्या इतिहासात रोहित शर्माने 25 डावांमध्ये सर्वाधिक 28 षटकार ठोकले आहेत. आशिया कप (ODI) च्या इतिहासात शाहिद आफ्रिदीने 21 डावात 26 षटकार ठोकले होते. या यादीत श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया चषक (ODI) च्या इतिहासात सनथ जयसूर्याने 24 डावात 23 षटकार ठोकले होते. (हे देखील वाचा: PAK vs SL Asia Cup 2023: करो या मरो सामन्यात श्रीलंकोविरुद्ध पाकिस्तानची प्लइंग 11 जाहीर, हरिस रौफ आणि नसीम शाह दुखापतीमुळे बाहेर)
आशिया कप (ODI) मध्ये सर्वाधिक षटकार
रोहित शर्मा- 28 षटकार
शाहिद आफ्रिदी- 26 षटकार
सनथ जयसूर्या- 23 षटकार
सुरेश रैना- 18 षटकार
मोहम्मद नबी- 13 षटकार
वनडेत केल्या 10 हजार धावा पूर्ण
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या बाबतीत स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 205 डावात 10 हजार धावांचा जादुई आकडा गाठला होता. टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने 259 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. रोहित शर्माने आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 248 सामन्यात 10031 धावा केल्या आहेत. 'हिटमॅन' रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 51 अर्धशतके आहेत.