Roger Binny

रॉजर बिन्नी अधिकृतपणे सौरव गांगुली यांचे उत्तराधिकारी झाले आहेत. रॉजर बिन्नी यांच्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) अर्थातच बीसीसीआय (BCCI) ची सूत्रे आली आहेत. रॉजर बिन्नी हे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आहेत. ते सौरव गांगूली यांच्यानंतर बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष म्हणून सक्रीय राहतील. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शाह यांच्याकडे सूत्रे राहणार आहेत. बिन्नी यांच्या घोषणेमुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत सुरु असलेल्या प्रदीर्घ काळच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार, नवीन प्रशासन आगामी T20 विश्वचषक आणि 2023 एकदिवसीय विश्वचषकासाठी संघासोबत काम करेल.

रॉजर बिन्नी यांनी पाठिमागील मंगळवारी (11 ऑक्टोबर) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. महत्त्वाचे म्हणजे बिन्नी यांच्या विरोधात कोणाचाच अर्ज दाखल झाला नाही. परिणामी त्यांना बिनविरोध सर्वोच्च पद मिळाले. 67 वर्षीय बिन्नी हे एकमेव उमेदवार होते ज्यांनी या पदासाठी नामांकन दाखल केले आणि निवडूनही आले.

ट्विट

दरम्यान, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण सिंग धुमाळ, जे सध्या कोषाध्यक्ष आहेत. ते आयपीएलचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. ते ब्रिजेश पटेल यांची जागा घेऊ शकतात. महाराष्ट्रातील भाजपचे प्रभावशाली नेते आशिष शेलार हे नवे कोषाध्यक्ष होऊ शकतात याचा अर्थ ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष होणार नाहीत. शरद पवार गटाच्या पाठिंब्याने ते ही भूमिका घेणार होते.