इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा पॅकअप होण्यास आता थोडाच वेळ शिल्लक आहे. यावर्षी आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात येणार? कोणता संघ यशस्वी ठरतो हे 15 ऑक्टोबर रोजी ठरवले जाईल. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यंदाही आयपीएलचे (IPL) विजेतेपद पटकावण्यात अपयशी ठरला. एलिमिनेटर सामन्यात संघाचे सर्व धुरंधर फलंदाज फ्लॉप ठरले आणि संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. विराट कोहलीचा आरसीबी (RCB) कर्णधार म्हणून हा अंतिम सामना होता. अशा परिस्थितीत, पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावात या संघाकडून काही मोठे बदल दिसू शकतात. पुढच्या वर्षी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी RCB च्या सर्व चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. अहवालानुसार आरसीबी संघ पुढील वर्षी त्यांचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सची (AB de Villiers) साथ सोडू शकतो. हा दावा माजी भारतीय क्रिकेटपटू आणि 2 वेळा आयपीएल विजेता गौतम गंभीरने केला आहे. गंभीरने म्हटले की पुढील वर्षी आरसीबी संघ डिव्हिलियर्सच्या जागी ग्लेन मॅक्सवेलला रिटेन करू शकतो. (IPL 2022 मेगा लिलावात 3 फ्रँचायझी David Warner वर लावू शकतात दाव, ‘हा’ संघ मारू शकतो एका दगडात दोन पक्षी)
आयपीएल 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. मॅक्सवेल यंदा RCB साठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या आयपीएलपूर्वी झालेल्या आयपीएल लिलावात आरसीबीने मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपयांना खरेदी केले आणि त्याने आपल्या संघाचा पैसे वसूल केला. याशिवाय आरसीबी संघ विराट कोहली आणि स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल यांनाही रिटेन करू शकतो. गौतम गंभीरच्या मते, तिसरा खेळाडू म्हणून आरसीबीने चहल आणि हर्षल पटेल यापैकी एकाला कायम ठेवावे. गंभीरने डिव्हिलियर्सबद्दल असे म्हटले आहे की, “मला वाटते आरसीबी ग्लेन मॅक्सवेलला कायम ठेवेल कारण तो भविष्यात आहे, डिव्हिलियर्स नाही.” आयपीएल 2022 पूर्वी यंदा वर्षाअखेरीस मेगा लिलाव होणार असल्याने आरसीबी लाइन-अपमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. संघ व्यवस्थापनाला एका नवीन कर्णधारासह त्यांचा संघ सुधारणे आणि पुनर्बांधणी करू इच्छित असतील जेणेकरून येत्या काही वर्षांत ते त्यांचे पहिले विजेतेपद जिंकू शकतील.
जेव्हा आयपीएल 2021 हंगामाची यूएई आवृत्ती सुरु झाली तेव्हा कोहलीने हंगाम संपल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. अशास्थितीत एलिमिनेटरमध्ये फ्रँचायझी पराभूत होऊन बाहेर पडल्याने आयपीएलचे एकही विजेतेपद त्याच्या नावावर न करता फ्रँचायझी कर्णधार म्हणून कोहलीची कारकीर्द संपुष्टात आली.