Shoaib Akhtar Stadium: पाकिस्तानमधील ‘या’ क्रिकेट स्टेडियमला मिळालं ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ शोएब अख्तरचं नाव, माजी गोलंदाजांने दिली अशी प्रतिक्रिया
शोएब अख्तर स्टेडियम (Photo Credit: Twitter/shoaib100mph)

Shoaib Akhtar Stadium: रावळपिंडीतील (Rawalpindi) केआरएल स्टेडियमला (KRL Stadium) पाकिस्तानचे दिग्गज आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांचे नाव देण्यात आले आहे. रावळपिंडी स्टेडियमचं (Rawalpindi Stadium) नाव बदलून आता शोएब अख्तर स्टेडियम करण्यात आलं आहे. शोएबने स्वत: स्टेडियमचा फोटो शेयर केला आणि पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाजाने आभार मानत लिहिले की, गेल्या अनेक वर्षांत मला मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि आदराबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. “रावळपिंडीच्या केआरएल स्टेडियमचं नाव बदलून शोएब अख्तर स्टेडियम (Shoaib Akhtar Stadium) करण्यात आलं आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एवढ्या वर्षांपासून मला जे प्रेम आणि सन्मान मिळाला आहे, त्यासाठी सगळ्यांचे आभार,” असं म्हणत शोएबने ट्विट केलं आहे. निवृत्तीच्या अनेक वर्षानंतरही क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडूचा (161.3 किमी प्रतितास) विक्रम त्याच्याच नावावर आहे.

शोएबने पुढे ट्विट करत लिहिले, “पाकिस्तानचा झेंडा उंच राहावा, यासाठ मी पूर्ण निष्ठेने आणि उत्कटतेने पाकिस्तानची सेवा केली. रोज मी छातीवर अभिमानाने पाकिस्तान क्रिकेटचा स्टार लावतो. धन्यवाद, पाकिस्तान जिंदाबाद.” यासह शोएबने स्टेडियमचे दोन फोटोही शेयर केले. यामधील एका फोटोवर शोएब अख्तर क्रिकेट स्टेडियम असं मोठ्या अक्षरात लिहिल्याचं दिसत आहे. शोएबच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास माजी वेगवान गोलंदाजाने पाकिस्तानकडून 46 टेस्ट, 163 वनडे आणि 15 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 178 कसोटी विकेट, वनडेमध्ये 247 आणि टी-20 मध्ये 19 विकेट्स घेतल्या आहे. शिवाय, टेस्ट क्रिकेटमध्ये 12 वेळा 5 विकेट आणि 2 वेळा 10 विकेट घेण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.

शोएब अख्तर हा जगातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. 2003 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउन येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याने ताशी 161.3 किलोमीटर वेगाने चेंडू फेकला होता. हा चेंडू अजूनही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू असून आज एकही गोलंदाज यापेक्षा वेगवान चेंडू फेकू शाळा नाही.