Rape Threats to Vamika: विराट कोहलीच्या 10 महिन्यांच्या मुलीला बलात्काराच्या धमक्या; Inzamam-ul-Haq ने केला निषेध
विराट कोहली (Photo Credit: PTI)

नुकतेच भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup) पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या पराभवामुळे अर्थातच भारतीय चाहते दु:खी झाले होते. पाकिस्तानी खेळाडूंकडून भारताचा झालेल्या या दारूण पराभवानंतर मोहम्मद शमीला त्याच्या कामगिरीमुळे ट्रोल करण्यात आले. तसेच शमीला तो मुस्लीम असल्याच्या कारणावरूनही लक्ष्य करण्यात आले, ज्यावर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला (मोहम्मद शमी) पाठिंबा दर्शवला. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर काही वापरकर्त्यांनी शमीचा बचाव करण्यासाठी पुढे आलेल्या विराट कोहलीवर हल्ला चढवला आहे.

एका वापरकर्त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची मुलगी वामिकावर (Vamika) बलात्काराची (Rape) धमकी दिली आहे. प्रिंट आणि ब्रॉडकास्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. सोशल मीडियावर युजरने कोहलीबाबत केलेल्या या आक्षेपार्ह ट्विटनंतर लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. धर्माच्या आधारावर एखाद्यावर हल्ला करणे अत्यंत निंदनीय आहे, असे विराट म्हणाला होता. त्यानंतर लोक विराटला ट्विटरवर ट्रोल करत आहेत. आता हे लोक इतक्या खालच्या पातळीला उतरले की, त्यांनी विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची 10 महिन्यांची मुलगी वामिकाला बलात्काराची धमकी दिली. (हेही वाचा: IND vs NZ: भारताच्या लाजिरवाण्या पराभावाच खापर IPLवर, #BANIPL मोठ्याप्रमाणात होतोय ट्रेट)

हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या युजरवर कडाडून टीका केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर कोहलीच्या समर्थनार्थ समोर आला आहे. त्याने भारताचा ‘सर्वोत्कृष्ट संघ’ म्हणून उल्लेख केला आहे, तसेच विराट च्या टुंबावर हल्ला करणे हे अतिशय निंदनीय असल्याचेही त्याने म्हटले आहे. यासोबत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनेही या कृत्याचा निषेध केला आहे. त्याच्या YouTube चॅनेलवर त्याने सांगितले आहे की, कोहलीच्या 10 महिन्यांच्या मुलीला लक्ष्य करणाऱ्या लोकांमुळे आपण दुखावले गेलो आहे. लोकांना हे समजणे आवश्यक आहे की हा फक्त एक खेळ आहे आणि खेळाडू जरी वेगवेगळ्या देशांसाठी खेळत असले तरी सर्वजण एकाच समुदायाचे आहेत.’