Ranji Trophy 2021 (Photo Credits: Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या हंगामात रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक आहे आणि खजिनदार अरुण धुमल (Arun Dhumal) यांच्या माहितीनुसार, खेळाडूंच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता प्रमुख देशांतर्गत स्पर्धा खेळवण्याच्या सर्व शक्यतांचा तपासात आहे. कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकारामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या रणजी ट्रॉफीसाठी नवीन योजना तयार केली आहे. भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत स्पर्धा दोन टप्प्यात आयोजित करण्याचा बोर्ड विचार करत आहे. रणजी ट्रॉफी या वर्षी 13 जानेवारीपासून खेळली जाणार होती, मात्र कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यास भाग पडले. या स्पर्धेत 38 संघ सहभाग घेतात.

रणजी करंडक सलग दुसऱ्या हंगामासाठी रद्द होण्याची शक्यता असल्याची खेळाडूंनी चिंता व्यक्त केल्याने बोर्डावर दबाव वाढत होता. 2020-21 हंगामात प्रीमियर देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती परंतु खेळाडूंना या वर्षाच्या सुरुवातीला रद्द झालेल्या देशांतर्गत सामन्यांसाठी भरपाई देण्यात आली होती. दरम्यान या वर्षी आयपीएलमुळे बीसीसीआय रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात आयोजित करायची आहे. बोर्ड 27 मार्चपासून आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू करण्याचा विचार करत आहे. ज्याची अधिकृत घोषणा फेब्रुवारी महिन्यात होईल. आयपीएलमुळे एका टप्प्यावर रणजी ट्रॉफीचे आयोजन कठीण होणार आहे. त्यामुळे मंडळाला आयपीएल सुरू होण्यापूर्वी काही सामने आणि आयपीएलनंतरचे शेवटचे काही सामने आयोजित करायचे आहेत. अरुण धुमल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही स्पर्धेसाठी सर्व शक्यता तपासत आहोत.

उल्लेखनीय आहे की बीसीसीआयने या स्पर्धेचे दोन टप्प्यात आयोजन केल्यास दुसऱ्या टप्प्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पहिला टप्पा पार पडल्यानंतर भारतातील अनेक भागात मान्सून सुरू होईल. गेल्या मोसमात कोरोना महामारीने देशांतर्गत क्रिकेटलाही हानी पोहोचवली होती. बीसीसीआयला विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली करंडक या दोनच स्पर्धांचे आयोजन करता आले. यादरम्यान बीसीसीआयने आर्थिक नुकसान झालेल्या सर्व खेळाडूंना भरपाई दिली होती.