युसूफ पठाण-अजिंक्य रहाणे (Facebook/Getty images)

रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2019-2020 च्या पहिल्या सामन्यात बडोद्याला (Baroda) 309 धावांनी पराभूत करून मुंबईने (Mumbai) त्यांच्या मोहिमेची सुरूवात केली. गुरुवारी, राऊंड 1 च्या पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईने बरोडा संघावर सहज विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी ठेवलेल्या 534 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बरोडा संघ 224 धावाच करू शकला. या सामन्यात असे काही घडले की क्रिकेटप्रेमी जरा आश्चर्यचकित झाले. अंपायरने बाद केल्यावर बडोदाचा फलंदाज युसुफ पठाण याने मैदान सोडण्यास नकार दिला. यानंतर ज्येष्ठ खेळाडू पठाण (Yusuf Pathan) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यात मैदानातच वाद झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये बराच काळ वाद सुरू होता आणि अखेरीस मुंबईच्या खेळाडूंना त्यात हस्तक्षेप करावा लागला. (Ranji Trophy 2019-20: पृथ्वी शॉ चा धमाकेदार कमबॅक, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईसाठी केले सर्वात जलद दुहेरी शतक)

बडोद्याच्या डावाच्या 48 व्या षटकात अंपायरने युसूफला झेल दिल्यावर ही घटना घडली. शशांक अटार्दे (Shashank Attarde) याचा चेंडू युसूफच्या पॅडवर लागला पण अंपायरने त्याला कॅच आउट दिले. पंचांच्या निर्णयाने युसुफ अत्यंत नाराज झाला आणि क्रीजवर उभा राहिला. युसूफच्या क्रीजवर उभे राहिल्यानंतर रहाणे त्याच्याकडे आला आणि दोघांमध्ये काही बोलणे झाले त्याच्यानंतर पठाण माघारी परतण्यास तयार झाला. पण पॅव्हिलिअनमध्ये परततानादेखी युसूफ निराश दिसला आणि मान हलवत तो परतला. पाहा हा व्हिडिओ:

मुंबईने प्रत्येक विभागात बडोद्याला पराभूत करून सामना जिंकला. पहिल्या डावात मुंबईने 1 43१ धावांचे विशाल स्कोअर उभारला. पृथ्वी शॉने 66, रहाणे 79, मुल्लानी 89 आणि शार्दुल ठाकूर याने 64 धावांचे योगदान दिले. यानंतर पहिल्या डावात मुंबईने बरोडाला 307 धावांवर ऑल आऊट केले. बडोद्याकडून केदार देवधर याने 160 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावातही मुंबईने वर्चस्व राखत आणि 409 धावांवर डाव घोषित केला. पृथ्वीने दुसऱ्या डावात फक्त 179 चेंडूत 202 धावा ठोकल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही 102 धावा केल्या. मुंबईने दिलेल्या 534 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बरोडा 224 धावाच करू शकला.