
सध्या रमजान (Ramadan) सुरु आहे आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुबईमध्ये आहे आणि टीम इंडियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत आहे. अशात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत एक नवीन आणि मोठा वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद शमीच्या एका फोटोवरून त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. फोटोमध्ये शमी सामन्यादरम्यान एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे, ज्यामुळे कट्टरपंथी त्याला लक्ष्य करत आहेत. बरेलीमध्ये मौलाना शहाबुद्दीन यांनी क्रिकेटपटूने रोजा न पाळल्याबद्दल जोरदार टीका केली आहे. मौलाना म्हणाले की, इस्लाममध्ये उपवास अनिवार्य घोषित करण्यात आला आहे. शमीने रमजानमध्ये उपवास न ठेवून मोठे पाप केले आहे.
मौलाना पुढे म्हणाले, ‘मोहम्मद शमीने उपवास न ठेवण्याचा गुन्हा केला आहे.’ मोहम्मद शमीला सल्ला देताना त्यांनी असेही म्हटले की, शरियतचे नियम आणि कायदे आहेत आणि त्यांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शमीचा जो फोटो व्हायरल होत आहे तो दुबईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील आहे. त्या सामन्यात शमीने 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. मात्र, शमीच्या समर्थनार्थ अनेक आवाज उठत आहेत आणि काही मौलानांनी तर त्याचा बचावही केला आहे.
शमीच्या समर्थनार्थ दिल्लीच्या मोती मशिदीचे इमाम मौलाना अर्शद यांनी म्हटले आहे की, मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना ना इस्लाम माहित आहे ना कुराण. त्यांनी सांगितले की इस्लाममध्ये प्रवाशाला उपवास करण्यापासून सूट आहे. मौलाना म्हणाले, 'मोहम्मद शमी सध्या भारताबाहेर दौऱ्यावर आहेत, त्यामुळे हे त्यालाही लागू होते.' उपवासाच्या बाबतीत, फक्त कुराणातील आदेशांचे पालन केले पाहिजे, बरेलीतील मौलाना किंवा इतर कोणाच्याही आदेशांचे पालन करू नये. शमी देशासाठी खेळत आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.’ (हेही वाचा: Rohit Sharma Captaincy Record In ICC Tournament: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा प्रवेश, आयसीसी स्पर्धांमध्ये कशी आहे कर्णधार म्हणून रोहित शर्माची कामगिरी; वाचा येथे)
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही क्रिकेटपटू मोहम्मद शमीला पाठिंबा दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी शमीचा बचाव केला आहे आणि संपूर्ण असोसिएशन शमीच्या पाठीशी उभी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर टीम इंडियात परतला आहे. फिटनेसच्या समस्येमुळे तो गेल्या अनेक महिन्यांपासून संघाबाहेर आहे. मात्र, त्याच्या पुनरागमनानंतर तो सातत्याने टीम इंडियामध्ये राहिला आहे. त्याने चॅम्पियन ट्रॉफीमध्येही चांगली गोलंदाजी केली आहे. मोहम्मद शमीने कबूल केले की, भारताचा एकमेव आघाडीचा वेगवान गोलंदाज असल्याने त्याच्यावर खूप जबाबदारी आहे.