राजवर्धन हंगरगेकर (Photo Credit: Instagram)

Rajvardhan Hangargekar Age Fraud: महाराष्ट्राचे (Maharashtra) क्रीडा आणि युवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहून भारताचा अंडर 19 विश्वचषक (India U19 World Cup) स्टार राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) याच्यावर वयाचा भंग केल्याचा आरोप केला आहे. 140kph वेगाने सतत गोलंदाजी करू शकणाऱ्या या वेगवान गोलंदाजाला चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) अलीकडेच आयपील लिलावात तब्बल 1.5 कोटी रुपयात खरेदी केले होते. बीसीसीआय आता या गंभीर प्रकरणाची चौकशी करणार आहे. अलीकडेच वेस्ट इंडिजमध्ये युवा टीम इंडियाच्या (Team India) अंडर-19 विश्वचषक विजयात हंगरगेकरची मोठी भूमिका राहिली आहे. मात्र, हंगरगेकर आता आपले खरे वय लपवण्याचा दोषी आढळल्यास हे सर्व वाया जाऊ शकते. ‘सामना’ वृत्तपत्रातील वृत्तानुसार बकोरिया या IAS अधिकाऱ्याने बीसीसीआयला एक औपचारिक पत्र लिहिले असून त्यात हंगरगेकरच्या विरोधात पुराव्यांचाही समावेश आहे.

अहवालानुसार, हंगरगेकर यांचे खरे वय 21 आहे. तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी, हंगरगेकर इयत्ता आठवीत प्रवेश घेत असताना, त्याची जन्मतारीख 10 जानेवारी, 2001 पासून बदलून 10 नोव्हेंबर, 2002 करण्यात आली. ज्यामुळे ते नुकतेच संपन्न झालेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास पात्र ठरला. तसेच BCCI ला लिहिलेल्या पत्रात बकोरिया यांनी धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल गुप्ता यांनी राजवर्धन हंगरगेकर यांची जन्मतारीख बदलल्याची पुष्टी केल्याच्या स्वरूपात पुरावे पाठवले असल्याचे देखील वृत्तपत्रात लिहिले आहे. दरम्यान यापूर्वी अशाच प्रकारची परिस्थिती बीसीसीआयने कठोरपणे हाताळली होती. काश्मीरच्या रसिक सलाम दार नावाच्या एका खेळाडूला वयाची फसवणूक केल्याप्रकरणी बीसीसीआयने 2 वर्षांची बंदी घातली होती.

दरम्यान, बीसीसीआयच्या तपासात हंगरगेकर दोषी आढळल्यास त्याच्यावर देखील बंदी घातली जाऊ शकते. आणि असे झाले तर हंगरगेकरसाठी मोठा धक्का ठरेल. इतकंच नाही तर त्याचा आयपीएल करारही रद्द होऊ शकतो. आयपीएल 2022 लिलावातही हंगरगेकर याला चेन्नई सुपर किंग्जने दीड कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन खरेदी केले आहे. मात्र, आता या वादानंतर हंगरगेकरांचे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.