IPL Auction (Photo Credit - Twitter)

IPL Auction 2024: आयपीएल 2024 चा (IPL 2024) लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत (Dubai) होणार आहे. याआधी सर्व चाहत्यांच्या नजरा गेल्या वर्षी न विकल्या गेलेल्या खेळाडूंवर खिळल्या होत्या. आज आपण त्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आयपीएल 2023 च्या (IPL 2023) लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही आणि यावेळी लिलावात त्यांना महागड्या किमतीत विकले जाऊ शकते. चला जाणून घेऊया कोण आहेत ते पाच खेळाडू. (हे देखील वाचा: IPL Team Brand Value: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक 725 कोटी रुपये, सीएसके दुसऱ्या स्थानावर; पाहा यादी)

डॅरिल मिशेल

नुकत्याच संपलेल्या विश्वचषक 2023 मध्ये डॅरिल मिशेलची उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. विश्वचषकात सर्वाधिक 500 धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता. या काळात त्याने फलंदाजीसोबतच उत्कृष्ट गोलंदाजीही केली. मिशेलला त्याच्या अष्टपैलू कौशल्यामुळे आयपीएलमध्ये जास्त मागणी असेल अशी अपेक्षा आहे. मिशेलने राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल 2022 च्या दोन सामन्यांमध्ये भाग घेतला होता. या न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूला 2023 च्या आयपीएलमध्ये एकही खरेदीदार मिळाला नाही, परंतु यावेळीच्या लिलावात मिशेलसाठी मोठी बोली अपेक्षित आहे.

ट्रॅव्हिस हेड

ट्रॅव्हिस हेडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आपली अष्टपैलू क्षमता दाखवली. त्याने सामन्यात पन्नास धावा केल्या आणि दोन बळी घेतले. त्याने आगामी आयपीएल लिलावात आपले नाव ठेवण्याचा निर्णय घेतल्याने संघ त्याला अष्टपैलू म्हणून संघात समाविष्ट करू इच्छितो. संपूर्ण विश्वचषकातील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 6 डावात 329 धावा केल्या. हेडला आयपीएल 2023 मध्ये कोणताही खरेदीदार सापडला नाही, परंतु त्याचा अलीकडील फॉर्म पाहता, यावेळी संघ त्याच्यावर मोठी बोली लावू इच्छित आहेत.

कुशल मेंडिस

आयपीएल 2023 च्या लिलावात विकला न गेलेला श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिसला आयपील 2024 मध्ये मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. खरं तर, नुकत्याच संपलेल्या विश्वचषक 2023 मध्ये मेंडिसकडून काही चांगल्या खेळी पाहायला मिळाल्या. त्यामुळे या लिलावात त्याच्यावर संघांची नजर राहणार आहे. मेंडिसने विश्वचषकात 294 धावा केल्या होत्या.

मुजीबूर रहमान

मुजीबूर रहमानला आयपीएल 2023 मध्ये एकही खरेदीदार मिळाला नाही. त्याचबरोबर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतही अफगाणिस्तानच्या या गोलंदाजाकडून फारशी चांगली कामगिरी दिसून आली नाही. पण आयपीएल 2024 मध्ये मुजीबूरवर अनेक संघ बोली लावू शकतात. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये मुजीबूर रहमानने फक्त 8 विकेट घेतल्या होत्या.