PBKS vs CSK IPL 2021: एमएस धोनीला (MS Dhoni) आयपीएल (IPL) 14 मध्ये चांगली सुरुवात मिळाली नाही. चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) मागील शनिवारी मोसमातील सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) हातून सात विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले होते. शिवाय, त्या स्पर्धेत स्लो ओव्हर-रेटमुळे एमएस धोनीला 12 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध होणाऱ्या आजच्या सामन्यात त्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे नाहीतर त्याच्यावर बंदी येऊ शकते. आपल्या संघाच्या स्लो ओव्हर-रेटसाठी जबाबदार धरणे धोनीला परवडणारे नाही, कारण या कृत्याबद्दल त्याला कठोर शिक्षा होऊ शकते. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या आवृत्तीपूर्वी बीसीसीआयने सर्व 8 सहभागी फ्रँचायझींना एका डावात 20 ओव्हर गोलंदाजीसाठी जास्तीत जास्त 90 मिनिटांच्या मर्यादेसंदर्भात सूचना दिल्या होत्या. (IPL 2021: दिल्लीकडून मिळालेल्या पराभवानंतर MS Dhoni याला बसला 12 लाखांचा फटका, जाणून घ्या काय आहे कारण)
आयपीएलच्या आचार संहितेनुसार पहिल्यांदाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्याकडून 12 लाख रुपयांचे दंड आकारले जाईल आणि पुढील दोन खेळांत वारंवार चूक झाल्यास कर्णधाराला कठोर दंड होऊ शकतो. सामन्याची बंदी घालण्याचा अंतिम निर्णय मॅच रेफरीवर अवलंबून आहे. त्यामुळे, आता दोन-चार आयपीएल सामन्यांची बंदी लागू नये म्हणून धोनीने आजच्या सामन्यात सावधगिरी बाळगली पाहिजे. आज रात्रीच्या सामन्याआधी धोनी आणि संघाला त्यांच्या चुकांचे परिणाम जाणून घेण्याची गरज जेणेकरून वेळेची मर्यादा ओलांडू शकणार नाहीत. शुक्रवार, 16 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसर्या सामन्यात सीएसके कर्णधाराला पंजाब किंग्जविरुद्ध गोलंदाजांवर कडक नजर ठेवावी लागणार आहे. सीएसकेच्या गोलंदाजांनी केली चूक धोनीला दोन सामन्यासाठी सामन्यातून बाहेर करू शकते.
दरम्यान, फलंदाजीमध्येही धोनी आपल्या सर्वोत्तम लयीत दिसत नाही आणि दिल्ली कॅपिटलासचा वेगवान गोलंदाज अवेश खानने पहिल्या सामन्यात सीएसकेचा कर्णधाराला शून्यावर तंबूत पाठवलं होतं. 2015 नंतर धोनी पहिल्यांदा खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली. विशेष म्हणजे मागील वर्षी आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघ पहिल्यांदा प्लेऑफ फेरीत पोहचण्यात अपयशी ठरला होता. दुसरीकडे, पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरोधात 4 धावांनी रोमांचक विजयाने सुरुवात केली असून आज सीएसके विरुद्ध ते विजयी लय कायम ठेवू पाहत असतील.