भारत-पाकिस्तान काश्मीर वादादरम्यान महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा रद्द होण्याची शक्यता, PCB ने दिले संकेत
भारत आणि पाकिस्तान महिला संघ (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan), या दोन्ही देशांमधील वादाचा परिणाम पुन्हा एकदा खेळावर होण्याची चिन्हे दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये मालिका घेण्यास भारतीय मंडळ, बीसीसीआयला (BCCI) सरकारकडून कोणतेही निर्देश न मिळाल्यामुळे पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा तहकूब होण्याची शक्यता आहे. हा दौरा आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग आहे. या चॅम्पियनशिप अंतर्गत भारतीय महिला संघाला (India Women's Cricket Team) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तानचे यजमानपद द्यावे लागेल. दोन्ही देशांमधील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता भारतीय क्रिकेट बोर्डाने सरकारच्या सूचनांची प्रतीक्षा करत आहे आणि याविषयी त्यांनी आधीपासूनच माहिती दिली आहे.  (IND vs SA T20I: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत 'या' 5 खेळाडूंवर राहील सर्वांची नजर, वाचा सविस्तर)

पीसीबीच्या अधिकाऱ्याने आरोप करत म्हटले की, "आम्ही अद्याप उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत कारण भारतीय मंडळाला यावर्षी नोव्हेंबरमध्ये महिला मालिका आयोजित करावी लागेल. ही मालिकादेखील रद्द केली जाऊ शकते, असे दिसते कारण भारत पाकिस्तानच्या महिला संघासोबत खेळण्यास तयार आहे असे दिसत नाही." पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने त्यांना वाट बघण्यास सांगितले आहे कारण पाकिस्तानी संघाचा भारत दौरा जुलै ते नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. शिवाय, जर भारत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देत असल्यास आयसीसीने त्यांना या मालिकेचे गुण द्यावेत अशी पीसीबीची इच्छा आहे. अशा परिस्थितीत, हा कार्यक्रम सध्या त्याच्या नियंत्रणाबाहेर आहे, या कारणावरून बीसीसीआयने त्याच्या दाव्याला विरोध करण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान, बीसीसीआयने म्हटले आहे की त्यांनी या मालिकेसाठी स्वीकृती मागितली आहे आणि जोवर केंद्र सरकार ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत ते जास्त काही करू शकत नाहीत. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अअधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "सरकारकडून प्रतिसाद मिळाल्यानंतरच आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करू शकतो. आपल्या सर्वांना माहित आहे की बीसीसीआय पाकिस्तानविरूद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्याबाबत एकटे निर्णय घेऊ शकत नाही. आम्हाला सरकारच्या सूचना पाळल्या पाहिजेत."