Yasir Shah (Photo Credits: Getty Images)

मुलीचे अपहरण, विनयभंग, बलात्कार आणि धमकावल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानचा (Pakistan) कसोटी लेगस्पिनर यासिर शाह (Yasir Shah) आणि त्याच्या मित्राविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या तक्रारीवरून लाहोरमधील शालीमार पोलिस (Shalimar Police) स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर पाकिस्तानी क्रिकेटपटूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एफआयआरमध्ये मुलीने आरोप केला आहे की, यासिरचा मित्र फरहान याने बंदुकीच्या जोरावर तिचे अपहरण केले, तिच्यावर बलात्कार केला, तिचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला धमकावले. याशिवाय यासिर शाहने आपल्या मित्राला मदत केल्याचा आरोप तरुणीने केला आहे आणि नंतर तिने आवाज उठवला तर तिचा व्हिडिओ रिलीज करण्याची फरहानने धमकी दिल्याचे देखील तिने म्हटले.

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुलीने यासिरला व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून मदतीची याचना केली तेव्हा तो तिच्यावर हसला आणि तिला या संपूर्ण प्रकरणाबद्दल गप्प राहण्यास सांगितले. तरुणीचा असाही दावा आहे की, जेव्हा ती पोलिसात गेली तेव्हा यासीरने तिला 18 वर्षांसाठी फ्लॅट आणि मासिक खर्च देण्याची ऑफर दिली, जर ती शांत राहिली. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असा दावा करत यावर भाष्य करण्यास नकार दिला. या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) म्हणाले: "पीसीबी सध्या माहिती गोळा करत आहे आणि संपूर्ण तथ्य असेल तेव्हाच टिप्पणी देईल.” “आम्ही लक्षात घेतले आहे की आमच्या एका सेंट्रली कॉन्ट्रॅक्टेड खेळाडूवर काही आरोप केले गेले आहेत. पीसीबी सध्या माहिती गोळा करत आहे आणि जेव्हा संपूर्ण तथ्य असेल तेव्हाच टिप्पणी देईल,” पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, 2014 मध्ये पदार्पण करणाऱ्या यासिर शाहने आतापर्यंत 46 कसोटी सामन्यांमध्ये 31.08 च्या सरासरीने 235 विकेट घेतल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एक शतकही ठोकले आहे. यासिर शाहने डिसेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंतचे एकमात्र कसोटी शतक केले आहे. याशिवाय बोटाच्या दुखापतीमुळे यासिरची अलीकडील कसोटी मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यासाठी निवड झाली नाही. (पीटीआय इनपुटसह)