PAK vs ENG 2021: इंग्लंड-पाकिस्तान संघात होणार भिडत, पण देशवासीय नाही लुटू शकणार लाईव्ह सामन्याचा आनंद; मंत्र्याने भारताकडे दाखवले बोट
पाकिस्तान क्रिकेट टीम ((Photo Credit: Getty)

PAK vs ENG 2021: पाकिस्तान संघ (Pakistan Team) पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर  (England Tour) जाणार आहे, पण पाक चाहत्यांना या मर्यादित ओव्हरच्या दौऱ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार नाही. पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी भारताकडे बोट दाखवून म्हटले की इंग्लंड दौर्‍यादरम्यान बाबर आजमच्या संघाचे सहा व्हाईट बॉल सामने देशात प्रसारित होणार नाहीत कारण दक्षिण एशियामध्ये भारतीय कंपन्यांचे प्रसारण हक्क आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय भारत सरकारने (Govt of India) मागे घेतल्यानंतरच भारतीय कंपन्यांसोबत व्यवसाय केला जाईल, असे फवाद चौधरी म्हणाले. उल्लेखनीय म्हणजे, वर दिलेल्या तारखेला भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष (Jammu-Kashmir Special Status) दर्जा रद्द केला आणि त्यास दोन केंद्र शासित प्रदेशात विभागण्यासाठी कायदा केला.

इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना चौधरी म्हणाले की, सामना प्रसारित करण्याचे अधिकार असणार्‍या स्टार आणि आशिया या भारतीय प्रसारकांशी करारासाठी पाकिस्तान दूरदर्शन कॉर्पोरेशनने (पीटीव्ही) विनंती नाकारली आहे. माहिती मंत्र्यांनी सांगितले की, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे संपर्क साधून आणखी एक तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. या राजकीय निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि पीटीव्हीला नक्कीच मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल, असे माहिती मंत्र्यांनी सांगितले. 8 जुलै रोजी कार्डिफ येथे पाकिस्तान संघ इंग्लंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यानंतर, 3 सामन्यांची टी-20 मालिका 16 जुलैपासून नॉटिंघॅममध्ये सुरु होईल.

सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPN) कडे इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्‍या मालिका प्रसारित करण्याचा आणि स्ट्रीम करण्याचा अधिकार आहे. तसेच स्टार इंडिया आयसीसीच्या कार्यक्रमांचे प्रसारण करतो. दरम्यान, भारत टी-20 वर्ल्ड कपचे देखील यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजन करणार आहे त्यामुळे, भविष्यात हा पुन्हा प्रश्न निर्माण होईल काय हे पाहणे बाकी आहे.