PAK vs ENG: न्यूझीलंडनंतर इंग्लंडचा दौराही रद्द होण्याच्या मार्गावर? ECB लवकरच घेणार निर्णय; पाकिस्तानमध्ये क्रिकेट पुन्हा सुरू होण्यावर संकट
इयन मॉर्गन (Photo Credit: Twitter/EnglandCricket)

न्यूझीलंडने (New Zealand) पाकिस्तानमध्ये (Pakistan) त्यांची मर्यादित षटकांची मालिका रद्द केल्यामुळे आता इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) पुढच्या महिन्यात दौऱ्यावर जाण्यापूर्वी सुरक्षेच्या परिस्थितीचे आकलन करण्यास सुरवात झाली आहे. न्यूझीलंड संघाने दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंड दौरा रद्द होणे हा पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरुज्जीवनाला मोठा धक्का आहे. पाकिस्तानात गेल्यानंतर वनडे मालिका सुरु होण्यापूर्वी किवी संघाने सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण दौरा रद्द केला. आणि आता असे वृत्त समोर आले आहे की इंग्लंड बोर्डही पुढील दोन दिवसात पाकिस्तानच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहे. अशा स्थितीत तथापि, इंग्लिश संघही या दौऱ्यातून माघार घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंग्लंडने सांगितले की, ते पाकिस्तानमधील परिस्थितीचे मूल्यांकन करतील आणि पुढील 24-48 तासांमध्ये त्यांच्या दौऱ्यावर निर्णय घेतील. (PAK vs NZ 1st ODI: न्यूझीलंड संघाचा पाकिस्तान दौरा रद्द, सुरक्षा कारणास्तव घेतला मोठा निर्णय)

दरम्यान, इंग्लंड ऑक्टोबरमध्ये दोन टी-20 सामन्यांसाठी रावळपिंडीला जाणार आहे, जे 2005 नंतर त्यांचा पहिला पाकिस्तान दौरा असेल. "सुरक्षा सतर्कतेमुळे पाकिस्तान दौऱ्यातून बाहेर पडण्याच्या न्यूझीलंडच्या निर्णयाची आम्हाला जाणीव आहे. आम्ही आमच्या सुरक्षा संघाशी संपर्क साधत आहोत जे परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी पाकिस्तानच्या मैदानावर आहेत," इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड ( ईसीबी) एका निवेदनात म्हटले आहे. "ईसीबी बोर्ड पुढील 24-48 तासांमध्ये निर्णय घेईल की आमचा नियोजित दौरा पुढे चालवायचा की नाही," बोर्डाने पुढे म्हटले. शुक्रवारी न्यूझीलंड संघाने पाकिस्तानविरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेपूर्वी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हे पाऊल उचलले. सुरक्षा धोक्यामुळे ते रद्द करण्याचा कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागला, असे मंडळाने म्हटले आहे. वनडे मालिकेनंतर लगेचच, संघ पाकिस्तानसोबत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार होता.

दुसरीकडे, वेस्ट इंडिज यंदा वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानला जाणार आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौराही होणार आहे.