On This Day in 2019: आजच्या दिवशी आजवरच्या सर्वश्रेष्ठ वनडे सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून इंग्लंड बनला विश्वविजेता, ICCच्या या नियमाने केले हैराण
इंग्लंड वर्ल्ड कप 2019 विजेता (Photo Credit: Getty)

आज अगदी एक वर्षापूर्वी, 14 जुलै, 2019, इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघात वनडे क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ सामन्यांपैकी एक असा सामना रंगला ज्यात इंग्लंडने विजय मिळवत विश्वविजेतेपद मिळवले.नाट्यमय अशा सामन्यात इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या आधारावर 2019 वर्ल्ड कपचा विजेता म्हणून घोषित केले. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords Cricket Ground) उपस्थित असलेल्यांनी इतिहास साक्षी बनले कारण पहिल्यांदाच इंग्लंड विश्वचषक स्पर्धेचा विजेता बनला. इंग्लंड-न्यूझीलंडमधील वर्ल्ड कप फायनल 2019 सामना टाय झाला आणि त्यांनतर सुपर-ओव्हर देखील टाय झाली. नंतर सामन्यादरम्यान जास्तीत जास्त चौकारांच्या आधारावर विजयी संघाचा निर्णय घेण्यात आला. या नियमानुसार इंग्लंडचा संघ (England Team) न्यूझीलंडवर भारी पडली. चौकारांच्या नियमांमुळे इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला, तर चमकदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद गमावले. त्यानंतर आयसीसीच्या नियमांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. (On This Day in 2002: आजच्या दिवशी दिसली टीम इंडियाची 'दादागिरी', सौरव गांगुलीने 18 वर्षांपूर्वी लॉर्ड्स येथे आपली जर्सी हवेत भिरकावून साजरा केला नेटवेस्ट मालिकेचा अविस्मरणीय विजय)

शेवटी, तीन महिन्यांनंतर (ऑक्टोबर 2018) आयसीसीने हा नियम काढून टाकला. म्हणजेच कोणतीही चौकार मोजणीच्या आधारे विजेता बनू शकत नाही. आयसीसीने स्पष्ट केले की, जर गट टप्प्यात सुपर ओव्हर टाय असेल तर सामना बरोबरीत राहील. दुसरीकडे, सेमीफायनल आणि अंतिम सामन्यात जोवर एक संघ दुसर्‍या संघापेक्षा अधिक धावा करत नाही तोवर सुपर ओव्हर सुरू राहिल. 14 जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 241 धावा केल्या. इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी 242 धावांची आवश्यकता होती, परंतु यजमान संघानेही 50 ओव्हरमध्ये 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला.

इंग्लंड-न्यूझीलंडमधील थरारक वनडे वर्ल्ड कप फायनल सामन्याचे हायलाईट्स पाहा:

या सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी सुपर ओव्हर खेळण्यात आली ज्यात इंग्लंडने 15 धावा केल्या आणि नंतर न्यूझीलंडलाही 15 धावा करता आल्या. सुपर-ओव्हरही टाय झाल्याने सर्वाधिक बाउंड्रीच्या आधारावर विजेत्याची घोषणा करण्यात आली. इंग्लंडने संपूर्ण सामन्यात डावासाठी एकूण 26 चौकार लगावले होते तर न्यूझीलंडच्या खात्यात 17 चौकार होते.  शेवटच्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्सच्या बॅटने ओव्हर थ्रो जाणे हाया सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता. शेवटच्या षटकात इंग्लंडला 3 चेंडूत 9 धावांची आवश्यकता असताना स्टोक्सने ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने दोन धावा घेतल्या, पण मार्टिन गप्टिलने स्ट्रायकरच्या दिशेने चेंडू फेकला जो स्टोक्सच्या बॅटवर लागला आणि उलटून सीमारेषे पार गेला. या चेंडूवर इंग्लंडला सहा धावा मिळाल्या आणि सामना येथेच उलटला.