भारताने जिंकले एशिया कप 1984 (Photo Credits: Twitter/ ICC)

1984 मध्ये पहिल्यांदा आशिया चषकचे (Asia Cup) आयोजन करण्यात आले. दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताने (India) विजय मिळवला. या दिवशी म्हणजेच 13 एप्रिल 1984 रोजी एशिया कपचा अंतिम सामना प्रथमच खेळला गेला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा (Pakistan) सामना केला. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या मोसमातील विजेता भारतीय संघाने पाकिस्तानला 54 धावांनी पराभूत केले. दरम्यान, आशिया कपच्या एक वर्षापूर्वी 1983 मध्ये भारतीय संघाने कपिल देवच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकला होता, परंतु या एशिया कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सुनील गावस्कर यांनी केले कारण कपिल या संघाचा भाग नव्हते. 1984 च्या आशिया चषक स्पर्धेत फक्त तीन संघ सहभागी झाले होते ज्यात भारत आणि पाकिस्तान तसेच श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ होता, जो त्यावेळी अत्यंत दुर्बल मानला जात होता. (On This Day: 25 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सचिन तेंडुलकर बनला वनडेमध्ये 3000 धावा करणारा सर्वात युवा फलंदाज)

भारताने विजेतेपद टेबल टॉपर म्हणून जिंकले, कारण या टूर्नामेंटमध्ये फक्त तीन सामने खेळले गेले आणि भारताने त्यांचे दोन्ही सामने जिंकले. 1984 आशिया कपचा पहिला सामना श्रीलंका-पाकिस्तानमध्ये खेळला गेला जो श्रीलंकेने जिंकला. दुसर्‍या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केले तर शेवटच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद जिंकले. पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या सामन्यात सुरिंदर खन्नाच्या 56 धावांच्या डावाच्या जोरावर भारतीय संघाने 46 षटकांत 4 गडी गमावून 188 धावा केल्या. कर्णधार गावस्करने 36 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 40 ओव्हरमध्ये पाकिस्तानला 134 धावांवर ऑलआऊट केले आणि 54 धावांनी विजय मिळवला. भारताकडून रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.

भारत आजवर आशिया कपचा सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आजवर सर्वाधिक 7 वेळा जेतेपदावर नाव कोरले आहे. सध्याचा आशिया चषक चॅम्पियन संघही भारत आहे. 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या एशिया कपच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने बांग्लादेशचा पराभव केला. श्रीलंका हा भारतानंतर आशिया खंडातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे ज्यांनी 5 आशिया चषक जेतेपदं जिंकली आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानने आजवर 2 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.