मार्टिन गप्टिल आणि रोहित शर्मा (Photo Credit: Twitter)

NZ vs BAN 1st T20I 2021: हॅमिल्टन (Hamilton) येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) बांग्लादेशचा (Bangladesh) 66 धावांनी धुव्वा उडवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. सामन्यात सलामी फलंदाज मार्टिन गप्टिलने (Martin Guptill) 27 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या आणि एका खास यादीत दुसरे स्थान मिळवले. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) तिसरा स्थानावर ढकलत गप्टिलने छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला. रोहितने टी-20 मध्ये 2864 धावा केल्या आहेत तर गप्टिलने आतापर्यंत 96 डावांमध्ये 7वेळा नाबाद राहत 2874 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय कर्णधार विराट कोहली 3159 धावांसह अव्वल स्थानी आहे. (IND vs ENG 5th T20I 2021: हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम, ‘या’ टी-20 यादीत विराट कोहलीनंतर पटकावले दुसरे स्थान)

दुसरीकडे, गप्टिलसाठी बांग्लादेशविरुद्ध आजचा सामना अत्यंत खास होता. गुप्टिल न्यूझीलंडकडून 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा दुसरा क्रिकेटपटू बनला आहे. गप्टिलपूर्वी 102 टी-20 सामने खेळणाऱ्या रॉस टेलरने ही कमाल केली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील शेवटच्या 95 डावांत 2839 धावा करून बांग्लादेशविरुद्ध पहिला सामना खेळण्यास मैदानात उतरलेल्या गप्टिलने डावात 26 धावा करताच रोहितला पछाडले. गप्टिलने आता रोहितपेक्षा फॉरमॅटमध्ये 10 धावा जास्त केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी -20 मालिकेत रोहितने मार्टिन गप्टिलला मागे टाकले होते, पण आता किवी फलंदाजाने पुन्हा एकदा सर्वाधिक टी-20 धावांच्या यादीत भारताच्या हिटमॅनच्या खाली ढकलले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली विराजमान आहे ज्याने 90 सामन्यांमध्ये 3159 धावा केल्या असून टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 3000 धावा पूर्ण करणारा विराट पहिला फलंदाज आहे. दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध गप्टिलने 35 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि दोन लांब षटकार लगावले. गप्टिलने न्यूझीलंडसाठी 2009 मध्ये टी-20 पदार्पण केले होते.

न्यूझीलंड फलंदाजाने टी-20 क्रिकेटमध्ये दोन शतके ठोकली असून यासह त्याने 17 अर्धशतकी डावही खेळले आहे. बांग्लादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात किवी टीमने पहिले फलंदाजी करत  3 विकेट गमावून 210 धावांचा डोंगर गाठला. प्रत्युत्तरात बांग्लादेश संघ 8 विकेट गमावून 144 धावाच करू शकला.