IND vs ENG 5th T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) मोटेरा स्टेडियमवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा (Team India) सलामी फलंदाजी रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार सुरुवात करत मालिकेतील आपले पहिले अर्धशतक ठोकले. रोहितने 30 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 3 षटकारांसह अर्धशतकी धावसंख्या गाठली. यासह रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंड फलंदाज मार्टिन गप्टिलला (Martin Guptill) तिसऱ्या स्थानावर ढकलत दुसरे स्थान पटकावले. रोहितच्या आता 111 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2847 धावा असून त्याने संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यानंतर यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. विराटच्या 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3099 धावा आहेत. यापूर्वी चौथ्या टी-20 सामन्यात रोहितने क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये 9000 धावा देखील पूर्ण केल्या होत्या. (IND vs ENG 5th T20I 2021: इंग्लंडविरुद्ध Virat Kohli देणार सलामी, पहा 'रनमशीन'ची ओपनर म्हणून कामगिरी)
111वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या रोहितने मोठा षटकार खेचत गप्टिलला पिछाडीवर टाकले. विशेष म्हणजे, संघर्ष करत असलेल्या केएल राहुलला आजच्या सामन्यात विश्रांती दिल्याने रोहितने शनिवारी पहिल्यांदा कर्णधार विराट कोहलीबरोबर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात केली. मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर सारख्या घातक गोलंदाजांच्या आक्रमणाचा सामना करत रोहित आणि विराटनेपॉवरप्लेमध्ये बिनबाद 60 धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलेल्या रोहितने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात 17 चेंडूत फक्त 15 धावाच केल्या होत्या. चौथ्या सामन्यात तो अवघ्या 12 धावांपर्यंतच मारू शकला. दुसरीकडे, टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्यापासून रोहित फक्त 6 षटकार दूर आहे. क्रिकेटच्या छोट्या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये गप्टिलने 139 षटकार खेचले आटत तर रोहित 133 षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे.
दुसरीकडे, आजच्या निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये इंग्लंडने कोणताही बदल केलेला नाही तर भारतीय संघात एक बदल झाला आहे. राहुलला वगळले असून विराट सलामीला आला आणि गोलंदाजीक्रम मजबूत करण्यासाठी तंदुरुस्त झालेल्या टी नटराजनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.