मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात डेविड वॉर्नर  (David Warner) आणि मिशेल मार्शच्या (Mitchell Marsh) जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Australia) आयसीसी नॉनआऊट स्पर्धेत न्यूझीलंडवर (New Zealand) वर्चस्व कायम ठेवले आणि यंदा केन विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघावर 8 विकेटने मात करून स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अशाप्रकारे क्रिकेट विश्वाला टी-20 मध्ये एक नवा चॅम्पियन संघ मिळाला आहे. यासह न्यूझीलंडचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. यापूर्वी 2019 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना दुर्दैवाने अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती. तसेच एकदिवसीय विश्वचषक 2015 च्या फायनल सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मात्र तिथे देखील किवी संघाच्या हाती पराभवाची निराशाच आली होती. आणि यंदा सलग तिसरे आयसीसी फायनल स्पर्धा खेळणाऱ्या किवी संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. उल्लेखनीय आहे की विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी ऑस्ट्रेलियाचे हे पहिलेच टी-20 जेतेपद आहे. (NZ vs AUS, T20 World Cup Final: फायनलमध्ये तळपली किवी कर्णधार केन विल्यमसनची बॅट, सर्वात वेगवान अर्धशतक ठोकून पुरुष टी-20 विश्वचषकात घडवला इतिहासात)

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या टी-20 विश्वचषकच्या ‘महामुकाबल्या’त ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत फलंदाजीला उतरलेले मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल संघासाठी चांगली सुरुवात करू शकले नाही. मिशेल चौथ्या षटकात मगघारी परतला. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने धुरा हाती घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. एका टोकाने विकेट्सची पडझड होत असताना विल्यमसन तग धरून खेळत राहिला आणि लाजवाब अर्धशतक झळकावले. पण मोक्याच्या क्षणी 18 व्या षटकात हेजलवूडने विल्यमसनचा अडथळाही दूर केला. विल्यमसनने 48 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 85 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर अ‍ॅडम झाम्पाने 1 विकेट घेतली. यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आरोन फिंचच्या रूपात पहिला झटका बसला. पण वॉर्नरने मिचेल मार्शच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला.

यादरम्यान वॉर्नरने 34 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. वॉर्नरने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांसह एकूण 53 धावांची खेळी केली. तर मार्श चेंडूत 77 धावा आणि ग्लेन मॅक्सवेल 18 चेंडूत 28 धावा करून नाबाद परतले. दोंघांनी मिळून संघाला विजयीरेष ओलांडून देत ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या टी-20 विश्वचषक विजयात निर्णायक भूमिका बजावली. न्यूझीलंडसाठी या सामन्यात अन्य गोलंदाज विकेटच्या शोधात राहिले तर वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने दोन विकेट घेतल्या.