टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव (Team India) झाल्यापासून भारतीय खेळाडूंवर बरीच टीका होत आहे. काही लोक टीम इंडियाच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियावर निशाणा साधला आहे. यासोबतच वर्कलोड मॅनेजमेंट या संकल्पनेवरही त्यांनी टीम इंडियाला सुनावले आहे. गावस्कर म्हणाले की, भारतीय संघाला "वर्कलोड मॅनेजमेंट" च्या पलीकडे जाण्याची गरज आहे. ते म्हणाले की, खेळाडू संपूर्ण इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळताना अशा संकल्पना विसरतात.
भारतीय खेळाडूंचे इतके लाड करू नये
गावस्कर म्हणाले- तुम्ही आयपीएल खेळता, संपूर्ण हंगाम खेळता, तिकडे फिरता. शेवटची आयपीएल फक्त एकाच राज्यात झाली होती. बाकी सगळ्यात तुम्ही इकडे तिकडे धावत राहतात. तुम्ही तिथे थकले नाहीत का? तेव्हा कामाचा ताण नव्हता का? जेव्हा तुम्हाला भारतासाठी खेळायचे असते, तेही जेव्हा तुम्ही नॉन-ग्लॅमरस देशांत जाता तेव्हा तुमच्यावर कामाचा ताण निर्माण होतो? हे चुकीचे आहे. गावसकर म्हणाले की, भारतीय खेळाडूंचे इतके लाड करू नये. बीसीसीआयने क्रिकेटपटूंना कडक संदेश देण्याची गरज आहे.(हे देखील वाचा: Sunil Gavaskar on India's Loss: भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर सुनील गावस्कर यांनी तोडले मौन, म्हणाले- काही खेळाडू निवृत्त होतील)
तुम्ही सामना खेळला नाही तर...
गावस्कर म्हणाले - कामाचा ताण आणि फिटनेस एकत्र असू शकत नाही. तंदुरुस्त असाल, तर कामाचा ताण पडण्याचा प्रश्नच कुठे येतो? आम्ही तुम्हाला संघात घेत आहोत, आम्ही तुम्हाला भरपूर रिटेनर फी देखील देत आहोत. जर तुम्ही कामाच्या ओझ्यामुळे खेळत नसाल तर रिटेनर फी देखील नाही दिली पाहिजे. जर तुम्ही सामना खेळला नाही तर तुमची रिटेनर फी दिली गेली नाही पाहिजे. मग बरेच खेळाडू कामाचा भार विसरून खेळायला येतील.