ICC च्या अध्यक्षपदी न्यूझीलंडच्या Greg Barclay यांची निवड, 2015 ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप आयोजन समितीचे अध्यक्षपदही भूषावलं
आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्कले (Photo Credit: Twitter/ICC)

न्यूझीलंडच्या ग्रेग बार्क (Greg Barclay) यांची दुसर्‍या फेरीच्या मतदानानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (International Cricket Council) नवीन स्वतंत्र अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पदावरून पायउतार झालेल्या भारताच्या शशांक मनोहर (Shshank Manohar) यांची जागा घेतील. ऑकलंडमध्ये स्थित व्यावसायिक वकील बार्क्ले 2012 पासून न्यूझीलंड क्रिकेटचे (New Zealand Cricket) संचालक आहेत आणि सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मंडळामध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधी आहेत. आयसीसीचे (ICC) स्वतंत्र क्षमतेने नेतृत्व करण्यासाठी ते न्यूझीलंड क्रिकेटमधील आपल्या पदावरून पायउतार होतील. ते आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप (ICC Men's World Cup) 2015 चे संचालक होते आणि नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट असोसिएशन माजी सदस्य व अध्यक्ष आहेत. ग्रेग हे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील अनुभवी कंपन्यांचे संचालक देखील आहेत.

क्रिकेटच्या सर्वात मोठ्या पदावर आपल्या नियुक्तीवर भाष्य करताना ग्रेग बार्कले म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड होणे हे सन्माननीय आहे आणि आयसीसीच्या माझ्या सह संचालकांच्या मदतीबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. मला आशा आहे की आपण एकत्र येऊन या खेळाचे नेतृत्व करू आणि जागतिक महामारीतून मजबूत स्थितीत येऊ आणि विकासासाठी तयारी दर्शवू. जगातील जास्तीत जास्त क्रिकेटचा आनंद लुटू शकेल याची खात्री करुन घेण्यासाठी मी आमच्या मुख्य बाजारपेठेतील खेळ अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सदस्यांसह भागीदारीत काम करण्यास उत्सुक आहे. मी खेळाचे संरक्षक म्हणून माझे स्थान अतिशय गांभीर्याने घेत आहे आणि आयसीसीच्या सर्व 104 सदस्यांच्या वतीने आमच्या खेळासाठी शाश्वत भविष्य घडविण्यासाठी मी काम करण्यास वचनबद्ध आहे.”

22 नोव्हेंबर 2015 ते 30 जून 2020 पर्यंत शशांक मनोहर यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले. पण, मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर जुलै 2020 मध्ये इमरान ख्वाजा यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. अध्यक्षपदासाठी ग्रेग यांनी ख्वाजा यांचा 11-5 असा पराभव करत सहा मतांनी विजय मिळवला.