Naman Ojha (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज (Wicketkeeper-Batsman) नमन ओझाने (Naman Ojha) सुमारे दोन दशके घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर, सोमवारी खेळाच्या सर्व प्रारूपातून निवृत्तीची घोषणा केली. रणजी ट्रॉफीमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक विकेट्स (351) नोंदवणाऱ्या या मध्य प्रदेशच्या अनुभवी खेळाडूने एक कसोटी, एक वनडे आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सोमवारी संध्याकाळी त्याने इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये आपल्या या निर्णयाची माहिती दिली. यावेळी तो खूप भावूक झाला होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रूही दिसून आले.

37 वर्षीय विकेटकीपर फलंदाजाने सांगितले की, यापुढे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुढे घेऊन जाऊ शकत नाही. त्याला कंबरदुखीचा त्रास आहे आणि कुटुंबाला वेळ देणे आता त्याचे प्राधान्य आहे. नमन हा मध्य प्रदेशातील रतलाम शहराचा रहिवासी आहे.

ओझा कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतासाठी खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर, 2010 मध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वे दौर्‍यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी त्याला दिली. त्या दौर्‍यामध्ये एक वनडे आणि दोन टी-20 खेळल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्याने एकदिवसीय सामन्यात 1 आणि दोन टी -20 सामन्यात 12 धावा केल्या. 4 वर्षांनंतर भारत-अ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर सलग दोन दुहेरी शतके ठोकल्यानंतर त्याला 2015 मध्ये श्रीलंका दौर्‍यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, ही त्याची पहिली आणि एकमेव कसोटी ठरली. त्याने कसोटीत 56 धावा केल्या. (हेही वाचा: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'या' 5 गोलंदाजांनी टाकल्या सर्वाधिक मेडन ओव्हर; भारतीय खेळाडूचाही यादीत समावेश)

महेंद्रसिंग धोनी संघात आल्यानंतर या यष्टिरक्षक फलंदाजाला पुन्हा संघात संधी मिळाली नाही. ओझाने वयाच्या 17 व्या वर्षी मध्य प्रदेशकडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो दोन दशके घरगुती क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक फलंदाज होता. ओझा इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळताना दिसला आहे. आयपीएलचे जेतेपद जिंकणार्‍या सनरायझर्स हैदराबाद संघाचा तो सदस्य होता. याशिवाय दिल्ली आणि राजस्थान या फ्रँचायझीसाठीही तो खेळला आहे.