एमएस धोनी रनआऊट (Photo Credit: YouTube)

स्टार भारतीय क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. चाहत्यांच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी धोनीने इंस्टाग्रामवर पोस्ट (Dhoni Instagram Post) शेअर केली. 39 वर्षीय विकेटकीपर फलंदाजाने त्याच्या निवृत्तीबाबत अनेक महिन्यांच्या अफवांनंतर ही घोषणा केली. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी, या तिन्ही आयसीसी ट्रॉफीमध्ये संघाला विजय मिळवून देणारा एकमेव कर्णधार धोनी देशातील सर्वात आवडता क्रिकेटपटू आहे. 23 डिसेंबर 2004 मध्ये चितगाँव येथे बांग्लादेशविरुद्ध (Bangladesh) वनडे सामन्यात धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तर 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये (World Cup Semifinal) धोनीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या दोन्ही सामन्यांमध्ये मात्र एक साम्य आहे आणि ते म्हणजे धोनीची बाद होण्याची पद्धत. होय, धोनी आपल्या पदार्पण आणि अखेरच्या सामन्यात दुर्दैवाने एकाच प्रकारे म्हणजे रनआऊटनेच बाद झाला. (MS Dhoni Retirement: एमएस धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, 'Thank You माही' म्हणत चाहते भावुक See Tweets)

मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात धोनी मार्टिन गप्टीलच्या अचूक थ्रो-वर धावबाद होऊन माघारी परतला होता. धोनी बाद झाला आणि संपूर्ण न्यूझीलंडच्या संघाने मैदानात जल्लोष केला होता. अवघ्या काही मीटरच्या अंतराने धोनी रनआऊट झाला. दुसरीकडे, 2004 मध्ये बांग्लादेशमध्ये पदार्पणाच्या सामन्यात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात खलिद मसुद आणि तपस बैस्या या जोडीने धोनीला धावबाद करत माघारी धाडलं आणि त्याच आंतरराष्ट्रीय पदार्पणचं अयशस्वी केलं. पाहा धोनीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हा व्हिडिओ:

न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनल रनआऊट:

धोनी हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने सर्व फॉरमॅटमध्ये विजयच नाही तर तीन आयसीसी ट्रॉफीस देखील जिंकल्या आहेत. शिवाय, 2009 मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताला शीर्षस्थानी नेणारा धोनी पहिला कर्णधार होता. प्रसिद्ध आयसीसी कसोटी चँपियनशिप गदा उंचावणारा तो पहिला भारतीयही ठरला. 2005 मध्ये श्रीलंकाविरुद्ध धोनीने केलेल्या नाबाद 183 धावा वनडे क्रिकेटमध्ये विकेटकीपरने केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावा आहेत.