Most Expensive Player in IPL History: 'हा' आहे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा प्लेअर, पाहा आयपीएल 2020 चे टॉप-5 करोडपती
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) लिलाव नेहमीच आश्चर्यचकित करणारा म्हणून ओळखला जातो. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात झाल्यापासून युवा क्रिकेटपटूंनी भारतीय आणि परदेशी खेळाडूंसोबत आपली प्रतिभा दाखवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. यंदा 2020 आयपीएलसाठी (IPL) डिसेंबर महिन्यात लिलाव करण्यात आला. या लिलावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला (Pat Cummins) कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मोसमातील सर्वाधिक 15.5 कोटी रुपयांत विकत घेतले. आयपीएल इतिहासातील आजवर दुसरा महागडा खेळाडू आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग विकणारा खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) आहे. युवीला 2015 च्या लिलावात तेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सने (दिल्ली कॅपिटल्स) 16 कोटी रुपयांत खरेदी केले होते. पण, यामुळे त्यांचे भवितव्य फिरवण्यास काहीच फायदा झाला नाही कारण युवीने 14 सामन्यांत 248 धावा करू शकला आणि दिल्ली गुणतालिकेत सातव्या स्थानावर राहिली.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला सर्वाधिक 17 कोटी रुपयात रिटेन केले गेले, तर एमएस धोनी आणि रिषभ पंतला त्यांची फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी 15 कोटी रुपयांत कायम ठेवले. मात्र लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला सर्वाधिक 15.5 कोटी रुपये मिळाले. आयपीएलच्या लिलावात दरवर्षी खेळाडूंना मोठी रक्कम दिली जाते यंदासाठी देखील असेच चित्र पाहायला मिळाले. पाहा आयपीएल 2020 मधील टॉप-5 करोडपती कोण आहेत ते...

1. पॅट कमिन्स (केकेआर, 15.5 कोटी)

2. ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब, 10.75 कोटी)

3. क्रिस मॉरिस (आरसीबी, 10 कोटी)

4. शेल्डन कोटरेल (किंग्ज इलेव्हन पंजाब, 8.5 कोटी)

5. नॅथन कोल्टर-नाईल (मुंबई इंडियन्स, 8 कोटी)

आयपीएलच्या लिलावात फ्रँचायझी खेळाडूंवर सर्वाधिक पैसे देत विकत घेतात, पण फक्त काही जणांना प्राईज टॅगला साजेशी कामगिरी करता येते. 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटला सर्वाधिक 8.4 कोटी रुपयांत विकत घेतले होते, 2018 मध्ये बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपये दिले, पण दोन्ही खेळाडू प्रभावी कामगिरी करू शकले नाही. त्यामुळे, यंदा तरी कमिन्स प्रभावी ठरतो की नाही हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.