MI vs DC, IPL 2020 Final: श्रेयस अय्यर-रिषभ पंतचा हल्लाबोल, फायनलच्या लढाईत दिल्लीचे मुंबई इंडियन्सला 157 धावांचं टार्गेट
रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs DC, IPL 2020 Final: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capials) यांच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलच्या अंतिम (IPL Final) लढाईत दिल्लीने पहिले फलंदाजी केली आणि 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 156 धावांपर्यंत मजल मारली आणि मुंबईला विजेतेपदासाठी 157 धावांचं टार्गेट दिलं. आयपीएल ट्रॉफीसाठी होणाऱ्या आजच्या अंतिम सामन्यात मुंबईने आक्रामक गोलंदाजी केली आणि दिल्ली फलंदाजांना मुश्किलीत पाडलं. मुंबईसाठी ट्रेंट बोल्टने (Trent Boult) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, नॅथन कोल्टर-नाईलला 2 तर जयंत यादवला 1 विकेट मिळाली. दुसरीकडे, दिल्लीसाठी रिषभ पंतने (Rishabh Pant) 56 तर कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 65 धावा केल्या. दिल्लीच्या डावात पंत आणि श्रेयसची भागीदारी महत्वाची ठरली. संघ संकटात असताना मैदानावर असलेल्या पंत आणि श्रेयसमधील 96 धावांच्या भागीदारीने संघालामुंबईविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. (MI vs DC, IPL 2020 Final: 'गब्बर' मुंबईविरुद्ध पुन्हा अपयशी, शिखर धवनने 15 धावांवर बाद होताच गमावली ऑरेंज कॅप पटकावण्याची संधी

)

टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. दुखापतीतून सावरलेल्या बोल्टने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर घातक मार्कस स्टोइनिसला माघारी धाडलं. त्यानंतर आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बोल्टने दिल्लीला दुसरा झटका. अजिंक्य रहाणे 2 धावा करून बोल्टच्या चेंडूवर विकेटकीपर क्विंटन डी कॉककडे कॅच आऊट होऊन परतला. त्यानंतर जयंत यादवने धवनचा त्रिफळा उडवला आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. दिल्लीसाठी हंगामात सलग दोन शतकं करणारा शिखर धवन आजच्या समन्यात फक्त 15 धावांचं करू शकला. महत्वाच्या सामन्यात अनुभवी खेळाडू स्वस्तात बाद झाल्यावर कर्णधार श्रेयस आणि विकेटकीपर पंतने संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. पंतला अगदी मोक्याच्या क्षणी सूर गवसला आणि आपली उपयुक्तता सिद्ध करत त्याने 34 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार खेचत दमदार अर्धशतक पूर्ण केलं, पण मोठा फटका खेळताना हार्दिक पांड्याकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावा केल्या. त्यानंतर श्रेयसने 40 चेंडूमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं.

आयपीएलच्या आजच्या सामन्यात दोन्ही संघ ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबई इंडियन्स विक्रमी पाचवे तर दिल्ली पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे दिल्लीने पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.