India vs Australia 2nd ODI 2019 (Photo Credit: IANS)

वर्ष 2020 टीम इंडियासाठी महत्वाच्या मालिकेपासून सुरु होणार आहे. जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारत (India) दौऱ्यावर येणार आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) याला 14 सदस्यीय संघात स्थान मिळाले आहेत. ऑस्ट्रेलिया 14 ते 19 जानेवारीपर्यंत भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतविरुद्ध प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान दिल्यास लाबूशेन वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. जोश हेझलवुड, सीन एबॉट, अ‍ॅश्टन टर्नर (Ashton Turner) आणि अ‍ॅश्टन अगर (Ashton Agar) यांचेही पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमधून दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या हेझलवूडचाही समावेश झाला आहे.उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, नॅथन कॉलटर-नाईल, ग्लेन मॅक्सवेल, नाथन लायन आणि मार्कस स्टॉयनिस यांसारख्या विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे, तर जेसन बेहरेन्डॉर्फ याला दुखापत झाली आहे.

या दौऱ्यावर सर्वात महत्वाची बाद म्हणजे, या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे तर जस्टिन लॅंगर यांना या दौर्‍यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. आरोन फिंच संघाचे नेतृत्व करेल, तर अ‍ॅलेक्स कॅरी आणि पॅट कमिन्स उप-कर्णधार असतील. 5 वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे.अ‍ॅडम झांपा आणिअ‍ॅश्टन अगरचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश झाला आहे. दोन्ही संघातील पहिला सामना 14 जानेवारीला मुंबईत, 17 जानेवारीला राजकोट आणि अंतिम सामना 19 जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.

ऑस्ट्रेलिया वनडे संघ: आरोन फिंच (कॅप्टन), सीन एबॉट, अ‍ॅश्टन अगर, अ‍ॅलेक्स कॅरी (उपकर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), पीटर हँडसकॉम्ब, जोश हेजलवुड, मार्नस लाबूशेन, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिशेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम झांपा.