भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने रियल इस्टेट कंपनी आम्रपाली ग्रुप विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्रपाली ग्रुपने तब्बल 40 कोटी रुपये थकवले असल्याचा आरोप धोनीने केला आहे.
2009 मध्ये महेंद्र सिंग धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसेडर झाला. त्यानंतर या ग्रुपसाठी धोनीने काही जाहिराती केल्या. मात्र 2016 मध्ये आम्रपाली ग्रुपने तब्बल 46,000 ग्राहकांची फसवणूक केली. पैसे घेऊन ग्राहकांना फ्लॅट देण्यात आले नाही. त्यानंतर धोनीने आम्रपाली ग्रुपसोबतचा करार संपवला.
मात्र धोनीने कंपनीसाठी केलेल्या जाहीराती, काम याबदल्यात धोनीला मोबदला देण्यात आला नाही. कंपनी धोनीचे एकूण 38.95 कोटी रुपये देणे बाकी आहे. यात 22.53 कोटी रुपये मूळ रक्कम तर 16.42 कोटींची व्याजाची रक्कम आहे. कंपनीने ठरवून दिलेला मोबदला दिला नसल्याने धोनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.