KKR vs DC, IPL 2020: नितीश राणा, सुनील नारायण यांचे दमदार अर्धशतक, नाईट रायडर्सचे दिल्ली कॅपिटल्ससमोर 195 धावांचे आव्हान
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  (Photo Credit: PTI)

KKR vs DC, IPL 2020: आयपीएलच्या (IPL) आजच्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 6 विकेट गमावून सुनील नारायण (Sunil Narine) आणि नितीश राणा (Nitish Rana) यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर 194 धावांपर्यंत मजल मारली आणि दिल्ली कॅपिटल्ससमोर (Delhi Capitals) विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले. केकेआरसाठी (KKR) पहिल्या फलंदाजी करत राणाने 81, कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) 17 आणि नारायणने 64 धावांचे योगदान दिले. राहुल त्रिपाठी 13, शुभमन गिलला 9 तर माजी कर्णधार दिनेश कार्तिकला 3 धावत करता आल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाज चांगल्या गोलंदाजीचा फायदा उचलू शकले नाही. दिल्लीसाठी एनरिच नॉर्टजे, मार्कस स्टोइनिस आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2 विकेट काढल्या. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्ली दुसऱ्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीने आजचा सामना जिंकल्यास ते पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर जातील आणि प्ले ऑफ फेरी गाठतील, तर केकेआरला आजचा सामना जिंकता आला तर ते प्ले-ऑफ शर्यतीत पुढे जाऊ शकतात. (DC vs KKR, IPL 2020: नितिश राणाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतकानंतर दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी, जाणून घ्या कारण)

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस आल्यानंतर कोलकाता संघाला दुसर्‍याच ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. नॉर्टजेने अवघ्या 6 धावांवर शुभमन गिलला अक्षर पटेलकडे कॅच आऊट करून माघारी धाडले. त्यानंतर नॉर्टजेने राहुल त्रिपाठीला 13 धावांवर बोल्ड केले. यानंतर रबाडाने दिनेश कार्तिकला विकेटच्या मागे झेलबाद केले. मात्र, नंतर नितीश राणा आणि सुनील नारायण यांनी शतकी भागीदारी करत दिल्लीच्या नाकीनऊ आणले. कोलकाताकडून नितीशने 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले तर नारायणने अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक ठोकले. नितीश-नारायणची जोडी कॅपिटल्ससाठी डोकेदुखी ठरत असताना रबाडाने वेस्ट इंडिज अष्टपैलूला अजिंक्य रहाणेकडे झेलबाद केले.

यापूर्वी, आजच्या सामन्यात दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. पृथ्वी शॉऐवजी रहाणेला, तर डॅनियल सॅम्सऐवजी एनरिच नॉर्टजे यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे कोलकात्यानेही त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले आहेत. टॉम बंटन आणि कुलदीप यादव यांच्याजागी कमलेश नागरकोटी आणि सुनिल नारायण यांचा टीममध्ये समावेश झाला आहे.