मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2025: आयपीएलमध्ये बुमराहची अनुपस्थिती संघासाठी मोठे आव्हानात्मक असेल, असे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी म्हटले आहे. जसप्रीत बुमराहच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा त्यांनी कोणताही कालावधी दिलेला नाही. बुमराह सध्या बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन प्रक्रियेतून जात असल्याने पाठीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतील पहिले काही सामने खेळू शकणार नाही.

"जसप्रीत बुमराह एनसीएमध्ये आहे," असे जयवर्धने यांनी बुधवारी मुंबई इंडियन्सच्या प्री-सीझन पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. सर्व खेळाडू सराव करत आहेत. बुमराह चांगल्या स्थितीत आहे, असे मुंबई जयवर्धने म्हणाले. पण त्याचे न खेळणे हे देखील संघासाठी एक आव्हान आहे. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे.

सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याला पाठीचा त्रास झाला आणि तो संघाबाहेर गेला. बुमराहच्या पुनरागमनाबाबत अनिश्चितता आहे. बुमराह एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबई संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.