IPL 2022: 15 व्या हंगामात 10 संघात रंगणार विजेतेपदाची लढत, BCCIला 'इतक्या' कोटींचा फायदा
बीसीसीआय (Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या हंगामापासून BCCI साठी बंपर कमाई करू शकते. आयपीएल (IPL) 15 मध्ये दोन नवीन फ्रँचायझी संघांची भर घातल्याने लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या खात्यात (बीसीसीआय) किमान 5000 कोटी रुपये आपल्या तिजोरीत भरू शकतात. आयपीएल विजेतेपदाची लढत सध्या आठ संघांमध्ये खेळली जाते परंतु पुढील वर्षापासून 10 संघ विजेतेपदाच्या शर्यतीत सामील होईल. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या  (IPL Governing Council) नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याच्या लिलाव प्रक्रियेला अंतिम रूप दिले गेले. बोर्डाने एका संघाची मूळ किंमत सुमारे 2 हजार कोटी रुपये ठेवली आहे. अशा स्थितीत बीसीसीआयला (BCCI) या 2 संघांकडून तब्ब्ल 5 हजार कोटी मिळू शकतात. पुढील हंगामापासून 60 ऐवजी 74 सामने खेळले जातील. दरम्यान, यंदांच्या हंगामातील स्थगित झालेले उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. (IPL 2022 New Teams Tender: आयपीएल संघाची मालकी आणि संचालनासाठी BCCI कडून निविदा जाहीर)

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “कोणतीही कंपनी 75 कोटी रुपये देऊन बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. यापूर्वी दोन नवीन संघांची मूळ किंमत 1700 कोटी रुपये मानली जात होती परंतु आता मूळ किंमत 2000 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलच्या आर्थिक बाजूकडे पाहणाऱ्या एका सूत्राने सांगितले की, जर बोली प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पार पडली तर बीसीसीआयला किमान 5000 कोटी रुपयांचा नफा होईल कारण अनेक कंपन्या बोली प्रक्रियेत रस दाखवत आहेत.” त्यांनी पुढे म्हटले, “बीसीसीआयला किमान 5000 कोटींची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात 74 सामने होतील आणि प्रत्येकासाठी ही एक फायद्याची परिस्थिती असेल.” असेही समजले आहे की केवळ 3000 कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना बोली प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी असेल. एवढेच नाही तर बीसीसीआय कंपन्यांच्या एका गटालाही संघ खरेदी करण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. यामुळे बोली प्रक्रिया अधिक मनोरंजक होईल.

सूत्रांनी म्हटले की, “तीनपेक्षा जास्त कंपन्यांना गट तयार करण्याची परवानगी दिली जाणार नाही, परंतु जर तीन कंपन्यांना एकत्र येऊन एखाद्या संघासाठी बोली लावायची असेल तर त्यांचे तसे स्वागत आहे.” नवीन संघांसाठी आधार स्थानांमध्ये अहमदाबाद, लखनौ आणि पुणे यांचा समावेश आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनौमधील एकाना स्टेडियम ही फ्रँचायझीची निवड असू शकते कारण या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता अधिक आहे.