अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा महासंग्राम सुरु आहे. या लीगच्या माध्यमातून खेळाडू आपली क्षमता दाखवून आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी खेळाडूंना आहे, ज्याद्वारे ते राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा दावा ठोकतात. पण, आतापर्यंत युवा खेळाडूंनी आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. या लीगने नेहमीच अनेक खेळाडूंचे करिअर घडवले आहे आणि त्यांना त्यांच्या देशाच्या संघात स्थान मिळवण्याची संधी दिली आहे. पण टीम इंडियाचा (Team India) एक खेळाडू असा आहे ज्याची आयपीएल कारकीर्दही संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. आणि तो कुणी दुसरा नाही तर टीम इंडियाचा दिग्गज कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आहे. (IPL 2022: अजिंक्य रहाणे याला भारतीय कसोटी संघात कमबॅक करण्यासाठी IPL मध्ये करावे लागणार ‘हे’ काम, माजी ओपनरचे मोठे विधान)

भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार रहाणे मोठे डाव खेळण्यासाठी प्रसिद्ध होता. मात्र खराब कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याला रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून संघात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी होती मात्र, तो तसे करू शकला नाही. तर दुसरीकडे रहाणे आयपीएल 2022 मध्ये फ्लॉप ठरत असल्याने त्याने फ्रेंचायझीच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. अशा परिस्थितीत आधीच टीम इंडियातून बाहेर पडलेल्या रहाणेवर आता आयपीएलमधूनही बाहेर पडण्याचे संकट ओढावले आहे. या मोसमात KKR संघात सामील झालेल्या रहाणे फक्त पाच सामने खेळला आणि यापुढे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही.

रहाणे आतापर्यंत या मोसमात केकेआरकडून केवळ 5 सामने खेळला आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. रहाणेने या मोसमातील 5 सामन्यात केवळ 80 धावा केल्या आणि त्याच्यामुळे केकेआर संघाला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर रहाणेच्या जागी आरोन फिंचची निवड केली आणि आता सुनील नारायण व सॅम बिलिंग्स यांना संधी मिळाली. फिंच सलामीला प्रभावित करत असला तरी नारायण आणि बिलिंग्सने निराश केले. त्यामुळे आता संपूर्ण मोसमात रहाणेला पुन्हा संधी मिळणार नाही, असे मानले जात आहे. रहाणेने आयपीएलच्या 153 सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 121 च्या स्ट्राइक रेटने 3941 धावा केल्या आहेत. पूर्वी त्याला मर्यादित षटकांचा चांगला फलंदाज मानले जात होते, परंतु कालांतराने तो केवळ कसोटी क्रिकेटमध्येच राहिला. आणि आता कसोटी संघातूनही बाहेर पडल्यानंतर त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर संकटाची तलवार लटकली आहे.